Advertisement

महापौर-उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे उमेदवार निश्चित


महापौर-उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे उमेदवार निश्चित
SHARES

मुंबई - मुंबईच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांचे नाव जाहीर झाले आहे. महापालिकेत सध्या तरी शिवसेना पक्ष हा मोठा असून भाजपाला फोडाफोडीत यश न मिळाल्यास महाडेश्वर यांचा महापौरपदी बसण्याचा मार्ग सुकर होणार आहे. शनिवारी दुपारी महापालिका चिटणीस कार्यालयात जाऊन त्यांनी महापौर पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

महापौरपदासाठी शुक्रवारपर्यंत आशिष चेंबूरकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. परंतु रात्री उशिरा पुन्हा सातमकर यांचे नाव पुढे आले होते. परंतु सकाळी महाडेश्वर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. प्रथमपासून सातमकर आणि चेंबूरकर यांचे नाव आघाडीवर होते. परंतु माजी महापौर विशाखा राऊत यांना पुन्हा महापौर बनवून सातमकर यांच्यावर स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जावी, असा विचार पक्षाने केला होता. त्यामुळे महापौरपदासाठी अन्य नावे पुढे आली होती. मात्र या सगळ्यात महाडेश्वर यांचे नाव अचानक पुढे आले आणि ते बाजी मारून गेले.

विश्वनाथ महाडेश्वर हे तिसऱ्यांदा महापालिकेचे सदस्य झाले आहेत. यापूर्वी त्यांनी शिक्षण समिती अध्यक्षपद भूषवले आहे. एकदा जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका असून नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपाचे कृष्णा पारकर आणि काँग्रेसचे धर्मेश व्यास यांचा पराभव केला. सातमकर आणि चेंबूरकर हे शहर भागातील असल्यामुळे पश्चिम उपनगरातील महाडेश्वर यांच्या नावाचा विचार करून हे नाव अंतिम करण्यात आले आहे. अनिल परब आणि संजय राऊत यांनी त्यांच्या नावाची शिफारस केल्याचे बोलले जात आहे.

उपमहापौर पदाच्या उमेदवार हेमांगी वरळीकर
मुंबईच्या उपमहापौरपदासाठी वरळीतील नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी महाडेश्वर आणि वरळीकर या अनुक्रमे महापौर आणि उपमहापौरपदासाठी महापालिका मुख्यालयात चिटणीस यांना उमेदवारी अर्ज सादर केला.

हेमांगी वरळीकर या 2012 मध्ये प्रथम निवडून आल्या आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रभाग 193 मधून त्या विजयी झाल्या आहेत. प्रजाच्या अहवालात त्यांना पहिला क्रमांक देण्यात आला होता. त्या सध्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा