Advertisement

राजकारण, लोकशाही आणि 'मी'...

भारतीय घटनेनुसार लोकशाही हक्कात मत, मतदार, उमेदवार आणि निवडणुका इत्यादी व्यतिरिक्त अनेक हक्कांचा उल्लेख आहे. परंतु, तुम्ही-आम्ही असा समज करून घेतलाय की सत्ता मिळालीच पाहिजे आणि तरच हक्काने समाजसेवा किंवा देशसेवा करता येते वगैरे वगैरे. म्हणजे लोकशाहीत राजकारण निव्वळ निवडणुका आणि सत्ताकारण ध्यानी ठेऊन करावे लागते असं सामान्यतः गणित आहे. प्रत्यक्षात तसे नाही.

राजकारण, लोकशाही आणि 'मी'...
SHARES

असा समज आहे की...निवडणुकीसाठी राजकारण करावे लागते, तसेच लोकशाही राजकारण सापेक्ष नसते. परंतु, भारतीय घटनेनुसार लोकशाही हक्कात मत, मतदार, उमेदवार आणि निवडणुका इत्यादी व्यतिरिक्त अनेक हक्कांचा उल्लेख आहे. परंतु, तुम्ही-आम्ही असा समज करून घेतलाय की सत्ता मिळालीच पाहिजे आणि तरच हक्काने समाजसेवा किंवा देशसेवा करता येते वगैरे वगैरे. म्हणजे लोकशाहीत राजकारण निव्वळ निवडणुका आणि सत्ताकारण ध्यानी ठेऊन करावे लागते असं सामान्यतः गणित आहे. प्रत्यक्षात तसे नाही. तर लोकशाहीवर विश्वास ठेऊन राजकारण करणे गरजेचे असते. त्यात आत्मा समाजकारणाचा आणि देशउन्नतीचा असावा. परंतु, हल्लीच्या 'अर्थपूर्ण' राजकीय धामधुमीत आपण हे सर्व विसरून गेलो आहोत. सत्तेत असल्यानं राज्य करणे सोपे असेल गणित भले असेल, परंतु लोकशाहीच्या अर्थात घटनेच्या अनेक कायदेशीर तरतुदींनुसार सत्तेशिवाय सुद्धा समाजकारण आणि समाजाचे उदात्तीकरण करणे अधिक सोपे असते.

मला लोकशाहीत सक्रिय सहभाग घ्यायचाय म्हणजे निवडणुकीसाठी उमेदवारी घेणे किंवा एखाद्या उमेदवारासाठी किंवा पक्षासाठी काम करणे इतकेच मर्यादित आहे, असा समज आहे. परंतु, त्यापलीकडे बरेच काही आहे. विविध सामाजिक गोष्टींचे भान ठेऊन 'मी' या संकल्पनेवर विश्वास ठेवा. लोकशाहीत मतदान करताना तुम्ही एकटेच असता. मतदान यंत्रावर बटण दाबताना तुमचा हात कोणी पकडत नाही. अगदी तशीच आहे 'मी'ची संकल्पना. इथे प्रत्येक नागरिकाला स्वतःचे मत आहे. मत म्हणजे फक्त पेटीतले नव्हे. हे मत तुमच्या लोकशाहीच्या निष्ठेप्रती असते. कधी कोणा विरुद्ध असते तर कधी कोणाच्या बाजूने. कुठल्या एखाद्या घटनेविरुद्ध किंवा बाजूने, कधी काही बाबतीत तुम्ही निःपक्षपाती असता. परंतु, रोजच्या लोकशाही जगात सक्रियता म्हणजे 'मत' असते, सजगता म्हणजे मत असते. 'मला काय करायचे...जाने दो ना...' असे म्हणून तुम्ही लोकशाहीला मारू नका. राजकारणाव्यतिरिक्त लोकशाहीत सहभाग शक्य आहे. तुमची काहीतरी भूमिका असणे महत्त्वाचे असते. चित्रपटात सगळेच हिरो बनू शकत नाहीत. परंतु सामूहिक गाण्यातील किंवा एखादया सामूहिक दृश्यातील शेवटचा कलाकारसुद्धा अगदी महत्वाचा असतो. त्याच्या शिवाय तो सीन पूर्ण होणार नसतो. तेव्हा लोकशाहीच्या चित्रपटात तुमची भूमिका कायम ठेवा. नागरिकांचा लोकशाहीवरील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असा प्रत्येक रोल महत्वाचा आहे. म्हणजेच अस्तित्व हवे. निवडणुकीच्या वेळी, अगोदर, नंतर आणि नेहमीच!

लोकशाहीत राजकारण निव्वळ निवडणुकीसाठी, असे गणित नाही हे लक्ष्यात घ्या. प्रत्येकाने राजकारणापलीकडे समाजाकडे बघणे गरजेचे आहे. समाज म्हणून आपण प्रथम आहोत. सुख-दुःखाला आपण एकत्र असणे महत्त्वाचे! अनेक सुख - दुःखाला माणुसकीच्या नात्याने आपण जवळ असतो ना एकमेकांच्या, तिथे राजकारण करतो का आपण? नाही ना! लोकशाहीतसुद्धा तसंच आहे असे प्रत्येक भारतीयाने लक्षात घेतले पाहिजे. आशा भूमिकेमुळे काळे कुट्ट होत चाललेले 'राजकारण' नावाचे ढग शुभ्र व्हायला वेळ लागणार नाही. 'मी' आणि माझ्या 'मताची'ची भूमिका मात्र खूप महत्वाची आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा