युतीची 'सदिच्छा'

 Mumbai
युतीची 'सदिच्छा'

नागपूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरमध्ये संघाच्या मुख्यालयात ‘सदिच्छा’ भेट घेतली. तब्बल 45 मिनिटं चाललेल्या बैठकीत ठाकरे-भागवत यांच्यात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे अप्रत्यक्ष संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. चलनबंदीविरोधात शिवसेनेने घेतलेला आक्रमक पवित्रा आणि मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपा युतीबाबत संदिग्धतेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जातेय. या दोन्ही विषयांवर उद्धव यांनी सरसंघचालकांशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. या भेटीनंतर शिवसेनेचा नोटबंदीबाबतचा आक्रमक सूर नरमण्याची शक्यता आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यासाठी नागपूरात आलेल्या उद्धव आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी सरसंघचालकांशी भेटीची संधी साधली. भाजपा-शिवसेना संबंध कितीही ताणलं असलं तरी शिवसेनेच्या बाबतीत संघ मवाळच राहिला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात तुरळक अपवाद वगळता भाजपाच्या नेत्यांनी ‘मातोश्री’कडे पाठ फिरवली. मात्र मोहन भागवत यांनी उद्धव यांच्याशी जवळीक कायम ठेवली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव आणि ठाकरे कुटुंबियांच्या सांत्वनासाठी ‘मातोश्री’ ला भेट दिली होती. महत्त्वाचं म्हणजे भाजपा सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेला सत्तेत सामावून घेण्यासाठी भागवत आग्रही होते. राज्याच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे यांची मन वळवण्यातही भागवत यांची भूमिका निर्णायक होती. आताही भागवत महानगरपालिका निवडणुकीत युतीसाठी अनुकूल आहेत.

Loading Comments