Advertisement

Ram Mandir: उद्धव ठाकरेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ ढोंगीपणा, विहिंपची टीका

रामजन्मभूमीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे घ्या, हा उद्धव ठाकरे यांचा सल्ला ऐकून आश्चर्य वाटलं. हा सल्ला पूर्णपणे आंधळ्या विरोधातून आला आहे, अशी टीका विहिपने केली.

Ram Mandir: उद्धव ठाकरेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ ढोंगीपणा, विहिंपची टीका
SHARES

श्री राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून घ्यावा, असा सल्ला देणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य हे ढोंगीपणाचं असून शिवसेनेचं अधःपतन झाल्याचं दर्शवत असल्याची टीका विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी केली आहे. सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं होतं. (whp criticized cm uddhav thackeray over e bhoomi pujan of ram mandir in ayodhya)

अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आहे. मी अयोध्येला जाऊन येईन. पण, लाखो रामभक्तांचे काय? त्यांना कसे अडवणार, त्यांच्या कळत-नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का? त्यावर उपाय म्हणून राम मंदिराचं भूमिपूजन दूरचित्रसंवादाद्वारे अर्थात ई-भूमिपूजन करता येईल, असा पर्याय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचवला होता.

त्यावर विश्व हिंदू परिषदेद्वारे प्रतिक्रिया देण्यात आली आहे. विहिपचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यासंदर्भात म्हणाले की, रामजन्मभूमीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे घ्या, हा उद्धव ठाकरे यांचा सल्ला ऐकून आश्चर्य वाटलं. हा सल्ला पूर्णपणे आंधळ्या विरोधातून आला आहे. एकेकाळी प्रखर हिंदुत्वावर ठाम असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं हे कसं अधःपतन झालंय. 

हेही वाचा - "राम मंदिर होईल, तेव्हाच कोरोना जाईल.."!

राम मंदिर उभारणीच्या कामाआधी होणारं भूमिपूजन हा एक पवित्र विधी आहे. जमिनीचं खोदकाम करण्याआधी पृथ्वी मातेची पूजा केली जाते, त्यांचा आशीर्वाद मागितला जातो. तसंच त्या ठिकाणी पाया खोदण्यासाठी परवानगी मागितली जाते. हे काम दिल्लीत बसून व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून नाही होऊ शकतं.

कोरोनाबाबत सर्व प्रकारची सावधगिरी बाळगून देश सामान्य जीवन जगण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने जगन्नाथ रथ यात्रा काढण्यास परवानगी दिली होती. अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली असली, तरी सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले.

भूमिपूजन कार्यक्रमात केवळ २०० लोकंच उपस्थित राहतील आणि सर्वांच्या आरोग्याची काळजी घेताना सर्व नियमांचं पालन करण्यात येईल, हे विहिपने वेळोवेळी स्पष्ट केलं आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांनी इतरांच्या आरोग्याची काळजी करणं म्हणजे केवळ विरोध करण्यासाठी केलेलं ढोंग आहे, असं अलोक कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम असलेल्या ठिकाणाची माती अयोध्येत आणण्यात येणार आहे.  

हेही वाचा - Ram Mandir: राम मंदिर भूमिपूजनाला जाणार उद्धव ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा