मुंबईची बदनामी करणाऱ्यांना धडा शिकवणारच - उद्धव ठाकरे

Andheri, Mumbai  -  

अंधेरी - देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईचे कौतुक करण्याऐवजी तिची बदनामी केली जातेय. मुंबईकरांची बदनामी करून मतं कसली मागता. या खोटेपणाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलाय. जो तो सांगतोय बरं झालं युती तुटली. ‘आता माझी सटकली’ असा आवाज संपूर्ण महाराष्ट्रातून येतोय, असं सांगत आता यांना धडा शिकवणारच, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे. अंधेरी येथे गुरुवारी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेत भाजपामध्ये सुरू असलेल्या गुंडांच्या प्रवेशावर जोरदार तोफ डागली, ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांनी पप्पू कलानीची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले. मुंडे गेल्यानंतर त्याच पप्पू कलानीला तुमच्या बॅनरवर घेता. पूर्वी संत-महंत यांच्या स्टेजवर बसायचे. आता हे गुंड स्टेनगन घेऊन बसतील. असली परिवर्तनाची व्याख्या तुमची असेल तर हे परिवर्तन माझ्या मुंबईत, महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारच

आम्ही केलेली कामे घेऊन लोकांसमोर आलोय, पण आजदेखील भाजपाला मेट्रो, रेल्वे ही आघाडी सरकारने केलेली कामे दाखवून मुंबईकरांकडे मतं मागायला लागत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जनतेच्या मुळावर येईल असं वाटतं तिथे मी टीका करणारच. सत्ताधाऱ्यांवर अंकुश म्हणून काम करू. हत्तीवर बसून अंकुश हाती ठेवणारच कारण या अंबारीत माझी मायबाप जनता बसली असल्याचं ते म्हणाले.

 

एका माळेच्या मण्यांत मला जायचं नव्हतं

मोदी, शहा आणि त्यांच्या बाजूला कलानी या एका माळेच्या मण्यांत मला जायचं नव्हतं. भाजपाच्या बॅनरचा फोटो बघितला, तेव्हा वाटलं बरं झालं युती तुटली. नाहीतर मोदी, शहा, कलानी या एका माळेच्या मण्यांत माझा फोटो आला असता, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Loading Comments