Advertisement

विजयादशमी नक्की कुणाची?


विजयादशमी नक्की कुणाची?
SHARES

दसरा म्हटलं की हिंदूंचा साडेतीन मुहूर्तातील एक सण आणि राजकारणातील शिवसेनेचा दसरा मेळावा असं साधारणतः त्याचं महत्त्व!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर दसरा मेळावा तितकासा चर्चेत राहिला नसला, तरी यंदाच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण, सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचा सतत सत्ताधारी भाजपाला होणार विरोध. शेतकरी कर्जमाफी, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन असे एक ना अनेक मुद्यांवर विरोधकांपेक्षा शिवसेनेचाच विरोध नजरेत भरण्याइतका होतो.

परवाच्या अंगणवाडी सेविकांच्या मोर्चाला सामोरे जाणाऱ्या, सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेले भाषण खरंतर उत्तम विरोधी पक्षनेत्याचे भाषण असायला हवे होते. 'विकास वेडा झालाय' या सोशल मीडियावर ट्रेंड असलेल्या टॅगलाइनला कॅश करतानाच, 'लोकशाहीची ठोकशाही होऊ देणार नाही', हे ठासून सांगणाऱ्या उद्धवना शिवसेनेचा इतिहास ठोकशाहीचाच आहे, याची कुणीतरी आठवण करून द्यायला हवी होती.

असो, शिवसेनेचा वाढलेला टोकाचा विरोध सत्तेतून बाहेर पडण्यापर्यंत जाईल की नाही याबाबत तर्कवितर्क सुरू असले, तरी दसरा मेळावा कदाचित या घोषणेचे स्थान ठरेल, असे कदाचित विरोधकांना वाटत असावे. म्हणूनच, शरद पवारांपासून अशोक चव्हाणांपर्यंत सारेजण उद्धवना सत्तेतून बाहेर पडण्याचे सल्ले न मागताच देत आहेत.

खरंतर सत्तेची खुर्ची कोणालाच सोडवत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खुर्चीचा इतिहास पाहता त्यांना विरोधी पक्षाची खुर्चीच मानवत नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. पण, सत्तेची ऊब मिळण्यासाठी भाजपाच्या दारात रांगा लावणाऱ्या त्यांच्या नेत्यांच्या बेडूकउड्या अजूनही सुरूच असल्याने शिवसेनेला 'सत्तेतला विरोधक' म्हणून सर्वात जास्त प्रसिद्धी मिळत आहे.

सुरुवातीला सत्तेत सहभागी न होता बाहेरून पाठिंबा देणारी शिवसेना आता 'मातोश्री'च्या मर्जीतील मंत्र्यांच्या रुपाने सत्तेत दिसते. परंतु, लोकांच्या मर्जीने निवडून आलेल्या शिवसेना आमदारांचा त्यांना असलेला विरोध या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने कसा थंड केला जातो? ते पाहायचे आहे. हे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंपुढे आहे.

उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे बंधू राज ठाकरेंनीही मोदींविरोधात दंड थोपटले आहेत. प्रादेशिक पक्ष असणाऱ्या मनसेचं खरं टार्गेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असायला हवे ना? पण राज्यातल्या देवेंद्रापेक्षा केंद्रातल्या नरेंद्रवरच राज ठाकरेंचे फेसबुक पोस्टिंग टार्गेटेड आहे.

दसऱ्याच्याच मुहूर्तावर मनसेकडून राज्यभर(?) महागाईविरोधी आंदोलनाचा हल्लाबोल होतोय. पण, शस्त्रपूजेच्या या दिवशी दोन्ही ठाकरेंची शस्त्रास्त्रे किती चालणार? हे कळायला मार्ग नाही.

चर्चेत तर असंही म्हटलं जातंय की, हा सर्व खेळच बनाबनाया आहे. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, या खेळाचाच अंक रंगवून काँग्रेस-राष्ट्रवादीचं अस्तित्व आणखीनच दीन करण्याचा हा डाव आहे.

अर्थात, राजकारणात काहीही अशक्य नाही असं म्हणतात. त्यामुळे विजयादशमीच्या मुहूर्तावर धडाडणाऱ्या ठाकरेंच्या तोफा फक्त आवाजी राहणार की प्रत्यक्षात सरकारला चीतपट (थोडंफार तरी) करणार हेच पहायचे!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा