Advertisement

तिशीनंतर युवा सेनेत 'नो एण्ट्री'! पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आणि धाकधुक!


तिशीनंतर युवा सेनेत 'नो एण्ट्री'! पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आणि धाकधुक!
SHARES

शिवसेनेने तरुण वर्गाला आपल्याकडे वळते करून घेण्यासाठी विद्यार्थी सेनेचं रुपांतर युवा सेनेत केलं. शिवाय आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या युवा सेनेची घौडदौड जोरात चालली आहे. पण युवा सेनेत तिशी पार करणाऱ्यांना यापुढे स्थान मिळणार नाही, असं आदित्य ठाकरेंनी जाहीर केलेलं असल्यामुळे तिशीचा उंबरठा पार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.


निवडीची प्रक्रिया सुरू

२०१०मध्ये युवा सेनेची स्थापना झाल्यानंतर युवा सेनेत १९ ते ३० वयोगटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहतील, असं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसारच युवा सेनेची कार्यकारिणी बनवली गेली. तसेच, विविध विभाग, जिल्हा यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. मात्र, आता युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाली असली, तरी युवा सेनेची नव्याने कार्यकारणीची निवड करण्यात येत असून त्या दृष्टीकोनात निवडीची प्रक्रिया सुरू आहे.


३० च्या वरील पदाधिकाऱ्यांचं काय?

युवा सेनेच्या नव्या कार्यकारिणीमध्ये मंत्री, शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार तसेच नगरसेवकांच्या मुलांना स्थान देण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांसमोर बोलतांना तिशीच्या आतील कार्यकर्त्यांचाच विचार युवासेनेत केला जाणार असून ३०च्या वरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रमुख पक्षासाठी काम करावे लागणार आहे, असं सांगितलं होतं.


मात्र, युवा सेनेचे सरचिटणीस अमोल किर्तीकर, कोषाध्यक्ष नगरसेवक अमेय घोले, कार्यकारिणी सदस्य समाधान सरवणकर, बाळा कदम यांच्यासह अनेकांनी वयाची तिशी ओलांडली आहे. त्यामुळे युवासेनेच्या धोरणानुसार या सर्वांना पदावरून हटवून मुख्य पक्षाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे विद्यमान पदाधिकारी आहे, त्यांनी फेरनिवड करून घेण्यासाठी फिल्डिंग लावली असली, तरी वयाची तिशी पार केल्याने नियमांची भिंत उभी राहणार आहे. त्यामुळे तिशीच्या वरील पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करून नवीन दमाच्या पदाधिकाऱ्यांची युवा सेनेच्या बांधणीसाठी निवड करावी लागणार आहे.


आदित्य ठाकरेंच्या भेटीपासून कार्यकर्त्यांना डावलले?

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना शिवसेनेच्या नेतेपदी बढती दिल्यानंतर आता युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली आहे. पण आदित्य ठाकरेंपासून युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना चार हात लांबच रोखण्याची रणनिती युवा सेनेतील मोठ्या पदावरील पदाधिकारी करताना दिसत आहेत. शिवसेना भवन येथे गुरुवारी झालेल्या युवा सेनेच्या कार्यक्रमातच हा प्रकार घडला असून त्यामुळे नाराजीही युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा