Advertisement

ग्राहक-बिल्डरांसाठी आता महारेराचा सामंजस्य कक्ष!

आता थेट महारेरात न जाता सामंजस्याने तक्रारीचे निवारण करावे लागणार आहे. कारण, आता लवकरच महारेराकडून एका 'स्वतंत्र कौन्सिलिएशन सेल' अर्थात 'सामंजस्य कक्षा'ची स्थापना करण्यात येणार आहे.

ग्राहक-बिल्डरांसाठी आता महारेराचा सामंजस्य कक्ष!
SHARES

महारेरा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडत असून महारेरानेही तक्रारींचे निवारण करण्याचा धडाका लावला आहे. ग्राहकांच्या तक्रारींचं लागलीच निवारणही होत आहे. पण ग्राहकांनो, आता थेट महारेरात न जाता सामंजस्याने तक्रारीचे निवारण करावे लागणार आहे. कारण, आता लवकरच महारेराकडून एका 'स्वतंत्र कौन्सिलिएशन सेल' अर्थात 'सामंजस्य कक्षा'ची स्थापना करण्यात येणार आहे.


कक्षाचा निर्णय मान्य नसेल, तर महारेराचा पर्याय

हा 'सामंजस्य कक्ष' आधी तक्रारींचे निवारण करेल आणि जर या कक्षाचा निर्णय मान्य नसेल, तर मग पक्षकार महारेराकडे जाऊ शकणार आहेत. अशा या कक्षाची स्थापना लवकरच होणार असून या कक्षाच्या कामकाजाला १ जानेवारी २०१८ पासून सुरूवात होईल, अशी माहिती महारेराचे सचिव वसंत प्रभू यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.



तक्रारी वाढल्या, निवारणास उशीर

मुंबईसह राज्यभरातून महारेराकडे तक्रारी येत असून या तक्रारी वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे साहजिकच या तक्रारींवर सुनावणी घेत अंतिम निर्णय देण्यास वेळ लागत आहे. या धर्तीवर महारेराने हा भार हलका करण्याबरोबरच तक्रारींचे शक्य तितक्या लवकर निराकरण करण्यासाठी 'सामंजस्य कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हा कक्ष स्थापन करण्याच्या प्रक्रियेला महारेराने वेग दिला असून पंधरा दिवसांत या कक्षाची स्थापना होणार आहे. तर १ जानेवारी २०१८ पासून ग्राहकांना या कक्षात दाद मागता येणार आहे.


असा असेल कक्ष...

सध्या तरी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशासाठी एक आणि पुण्यासाठी एक असे दोन सामंजस्य कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. या कक्षामध्ये बिल्डर संघटनांचे (क्रेडाय, एमसीएचआय, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया) प्रतिनिधी आणि ग्राहक पंचायतीचे प्रतिनिधी असतील. एमएमआरच्या कक्षात बिल्डरांचे ५ आणि ५ ग्राहक संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. हा कक्ष स्थापन करण्यासाठी महारेराकडून बिल्डर संघटनांना पत्र पाठवत प्रतिनिधींचे नावे देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे प्रभू यांनी सांगितले आहे.


दोन्ही पक्षांची तयारी असेल तरच कक्षात तक्रार

बिल्डर आणि ग्राहक हे दोघेही सामंजस्य कक्षाकडे निवाडा करण्यासाठी जाण्यास तयार असतील, तरच कक्षात तक्रार दाखल करता येणार आहे. या कक्षात बिल्डरांचे प्रतिनिधी असल्याने ग्राहकांना न्याय मिळेल का? याबाबत शंका उपस्थित होण्याची शक्यता आहे. महारेराने मात्र ही शक्यता नाराकारली आहे.


बिल्डरांबरोबरच या कक्षात ग्राहकांचे प्रतिनिधीही असल्याने ग्राहकांना नक्कीच न्याय मिळेल. दोघांची बाजू ऐकून सामंजस्याने निर्णय देण्यात येणार आहे. त्यातही जर ग्राहक या निर्णयाने समाधानी झाला नाही, तर त्याला महारेराकडे न्याय मागता येणार आहे. हा कक्ष नक्कीच ग्राहकांच्या हिताचे काम करेल.

वसंत प्रभू, सचिव, महारेरा



हेही वाचा

१९ महिने होऊनही महारेरा अपील लवादाचा पत्ता नाही


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा