Advertisement

Mutual Fund भाग ३ : 'हे' आहेत म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचे बहुपर्याय

म्युच्युअल फंडांचे विविध प्रकार आणि या योजना जाणून घेतल्या तर गुंतवणुकीचा निर्णय घेणं सोपं जाईल. या लेखात आपण फंडांचे विविध प्रकार जाणून घेऊयात.

Mutual Fund भाग ३ : 'हे' आहेत म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचे बहुपर्याय
SHARES

म्युच्युअल फंडांत (Mutual Fund) गुंतवणूक करणं का आवश्यक आहे, ती कशी करावी, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे फायदे याची माहिती आपण मागील लेखांमध्ये घेतली. ४४ म्युच्युअल फंड कंपन्याच्या शेकडो योजना आहेतपण कोणत्या प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करायची याची माहिती अनेकांना नसते. परिणामी अनेक जण म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडं कानाडोळा करतात. मात्र, म्युच्युअल फंडांचे विविध प्रकार आणि या योजना जाणून घेतल्या तर गुंतवणुकीचा निर्णय घेणं सोपं जाईल. या लेखात आपण फंडांचे विविध प्रकार जाणून घेऊयात.


ओपन-एंडेड योजना

या योजनेत कधीही गुंतवणूक करता येते. तसंच कधीही या योजनेतून गुंतवणूक काढून बाहेर पडता येतं. या योजना कायम खुल्या असतात. म्युच्युअल फंडांमध्ये ओपन-एंडेड योजना सर्वोत्तम मानल्या जातात. कधीही या योजनेत गुंतवणूक करता येतेच. पण गुंतवणूकदाराला एेनवेळी पैशाची गरज भासल्यास तो आपले युनिट विकून आपली पैशाची गरज भागवू शकतो.


क्लोज-एंडेड योजना 

या योजना ३ वर्षे मुदतीच्या (लाॅक इन पिरियड) असतात. मात्र, काही योजना ह्या ३ वर्षांपेक्षा अधिक मुदतीच्या असू शकतात. या योजना सुरू झाल्यानंतर काही काळच गुंतवणुकीसाठी खुल्या असतात. त्यानंतर या योजनांमध्ये गुंतवणूक करता येत नाही. योजना सुरू झाल्यानंतर काही ठरावीक दिवसांची मुदत गुंतवणुकदारांना दिलेली असते. या मुदतीत या योजनांमध्ये गुंतवणूक करता येते. मात्र, या योजनेची मुदत संपल्यावरच त्यातून पैसे काढता येतात. या योजना बंद झाल्यानंतर त्यांची नोंदणी शेअर बाजारात केली जाते. त्यानंतर या योजनांची शेअर बाजारात शेअर्सप्रमाणे खरेदी-विक्री केली जाते.


इंटरवल स्कीम

या योजना ह्या ओपन-एंडेड व क्लोज-एंडेड योजनांचे मिश्रण असतात. यामध्ये ठराविक कालावधीसाठी गुंतवणुकदारांचे पैसे लाॅक असतात. म्हणजे या कालावधीत गुंतवणूकदारांना पैसे काढता येत नाहीत. मात्र, या योजनांमध्ये प्रवेश करण्याची आणि बाहेर पडण्याची संधी अनेकदा मिळते. हा कालावधी मासिक, तिमाही किंवा वार्षिक असू शकतो. म्हणजे ठरावीक कालावधीनंतर या योजना गुंतवणुकीसाठी पुन्हा खुल्या होतात. गुंतवणुकीचा हा कालावधी संपल्यानंतर त्या बंद होतात. मग त्यानंतर आणखी काही कालावधीनंतर त्या खुल्या होऊन बंद होतात.

या योजनांमध्ये हे चक्र असेच सुरू राहते. उदा. वार्षिक इंटरवल फंड ३६५ दिवसांसाठी लाॅक असतो. ३६५ दिवस संपल्यानंतर पुढचा दिवस हा या योजनेत प्रवेश करण्यासाठी तसंच बाहेर पडण्यासाठी असतो. म्हणजे या दिवशी गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करू शकतो. तसंच जे अगोदर या योजनेत आहेत ते यातून बाहेर पडू शकतात. किंवा आपली गुंतवणूक ते तशीच कायम ठेवू शकतात. दोन दिवस ही योजना यावेळी सुरू राहते. काही योजनांमध्ये मासिक आणि तिमाही हे चक्र सुरू राहतं.

पुढील लेखात इक्विटी म्युच्युअल फंडांबद्दल जाणून घेऊया.



हेही वाचा  -

'हे' आहेत म्युच्युअल फंडाचे १० फायदे

गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडच का? जाणून घेऊया म्युच्युअल फंडाविषयी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा