उच्च न्यायालयाच्या इतिहासात 'असं' कधीच घडलं नाही! हॅट्स ऑफ!

जॉली एलएलबी चित्रपट बहुतेक सगळ्यांनीच पाहिला आहे. मात्र, या गोष्टी फक्त चित्रपटात होऊ शकतात अशी आपली धारणा आहे. बऱ्याच अंशी ती खरीही आहे. मात्र, देशात असं एक कोर्ट आहे, जिथे साक्षात जॉली एलएलबीसारखा प्रकार घडला! आणि हे कोर्ट दुसरं-तिसरं कोणतंही नसून ते आहे मुंबई हाय कोर्ट!

  • उच्च न्यायालयाच्या इतिहासात 'असं' कधीच घडलं नाही! हॅट्स ऑफ!
SHARE

न्यायालय म्हटलं की, मग ते महानगर दंडाधिकारी न्यायालय असो वा उच्च न्यायालय...न्यायालयाचं काम हे साधारणत: सकाळी ११ वाजता सुरू होतं आणि जास्तीत जास्त संध्याकाळी ६ वाजेपर्यंत संपतं. पण शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात एक ऐतिहासिक घटना घडली!


सलग १७ तास चाललं काम

उच्च न्यायालयाचं सकाळी १० वाजता सुरू झालेलं न्यायदानाचं काम संध्याकाळी ६ नंतरही सुरूच होतं. ६ चे रात्री १० वाजले, १२ वाजले तरी न्यायालयाचं कामकाज सुरूच होत आणि शेवटी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी काम संपलं. सलग १७ तास न्यायालयाचं कामकाज सुरू होतं. देशात आजपर्यंत कुठेही अशाप्रकारे न्यायालयात सलग पंधरा तास काम झालं नसल्याचं सांगत अनेक वकिलांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचं म्हटलं आहे.


उच्च न्यायालयाचे आदर्श न्यायमूर्ती!

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांची एक वेगळीच ओळख आहे. ती म्हणजे न्यायालयाच्या कामात वाहून घेणारे न्यायामूर्ती अशी! न्या. काथावाला हे नेहमीच याचिकांचं महत्त्व लक्षात घेत त्या शक्य तितक्या लवकर निकाली काढण्यास प्राधान्य देताना दिसतात. त्यामुळेच याआधी साधारणत वर्षभरापूर्वी न्या. काथावाला यांनी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत न्यायादानाचं काम केलं होतं. तर आठवड्याभरापूर्वीही दोनदा त्यांनी मध्यरात्रीपर्यंत काम करत प्रलंबित खटले निकाली लावल्याचं समजतं आहे.दिवसभरात काढली १६० प्रकरणं निकाली

उच्च न्यायालय शनिवारपासून उन्हाळी सुट्टीसाठी बंद राहणार होतं. त्यामुळे शुक्रवार हा न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजाचा शेवटचा दिवस असल्यानं न्या. काथावाला यांनी शुक्रवारी थेट १६० प्रकरणं आपल्या बोर्डावर लावली. त्यातल्या सुमारे ७० प्रकरणांमध्ये पक्षकार आणि वकिलांनी तातडीचा दिलासा देण्याची विनंती अर्जाद्वारे केली होती. त्यानुसार या प्रकरणांना प्राधान्य देण्याचं ठरवत न्या. काथावाला यांनी सकाळी १० वाजता कामाला सुरूवात केली.


दुसऱ्या दिवशी पुन्हा चेंबरमध्ये हजर!

दुपारी जेवणासाठी त्यांनी केवळ अर्ध्या तासाची सुट्टी घेतली. त्यानंतर न्यायालयातील कोर्ट रूम २० मध्ये न्यायदानाच्या कामाला सुरूवात झाली नि हे काम पहाटे ३.३० वाजता संपलं. न्यायालयाच्या संपूर्ण इमारतीत शुकशुकाट असताना कोर्ट रूम २० मध्ये कर्मचाऱ्यांसह पक्षकार आणि वकिलांची खच्चून गर्दी होती. ३.३० वाजता काम संपल्यानंतर जो तो घरी गेला. उल्लेखनीय बाब म्हणजे पहाटे घरी पोहचलेले न्या. काथावाला शनिवारी पुन्हा सकाळी साडे दहा वाजता आणखी काही प्रकरणं निकाली काढण्यासाठी आपल्या चेंबरमध्ये उपस्थित राहिले. न्या. काथावाला यांच्या या योगदानाचं वकिलांसह सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


संबंधित विषय
ताज्या बातम्या