Advertisement

'के' फाॅर काही का असेना, लक्षात ठेवा फक्त 'सी' फाॅर कोरोना!

पंतप्रधानांसमोर बारापंधरा टीव्ही कॅमेरे, काही स्टिल फोटोग्राफर… प्रशिक्षित मोर त्यांच्यासमोर सोडले जातात… तेवढ्यात एका मोराच्या आतून एक वार्ताहर बाहेर पडतो आणि त्यांना विचारतो...

'के' फाॅर काही का असेना, लक्षात ठेवा फक्त 'सी' फाॅर कोरोना!
SHARES

प्रसंग पहिला

अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेतून बाहेर पडत आहेत… अचानक त्यांना टीव्ही पत्रकारांचा घेरा पडतो… सगळे त्यांच्या तोंडासमोर माइकचं बोंडूक नाचवत विचारतायत, “मॅडम, जीडीपी का घसरला?”, “मॅडम, जीडीपी बेकायदा बांधकामासारखा उद्ध्वस्त का केलात?” “कोरोनाकाळावर बिल का फाडताय, कोरोना यायच्या आधीच अर्थव्यवस्था आचके देत होती…” निर्मलाबाईंना त्या गर्दीतून अंग चोरून पळ काढायला लागतो…

***

प्रसंग दुसरा 

पंतप्रधानांसमोर बारापंधरा टीव्ही कॅमेरे, काही स्टिल फोटोग्राफर… प्रशिक्षित मोर त्यांच्यासमोर सोडले जातात… तेवढ्यात एका मोराच्या आतून एक वार्ताहर बाहेर पडतो आणि त्यांना विचारतो, “रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता, देश कोरोनामुळे बरबाद होत असताना तुम्ही तीन तीन वेळा कपडे बदलून मोरांना दाणे काय घालताय? गवतावर उलटी पुस्तकं ठेवून वाचन कसं काय जमतं तुम्हाला?” 

***

प्रसंग तिसरा

भारत चीन सीमारेषेवरच्या एका बंकरमध्ये एक वार्ताहर बसलाय… तो जवानाला विचारतोय… चिनी सैन्य नेमकं कुठे आहे? काही घुसखोरी झालीच नाही, तर आपण त्यांना उत्तर कशाचं देतोय? आपले २० जवान कशामुळे मारले गेले? आपणच चीनच्या हद्दीत घुसखोरी केली होती की काय?…

...तुम्ही नियमित न्यूज चॅनेल पाहात असाल तर ही किंवा अशी दृश्यं, अशी पत्रकारिता कोणत्याही चॅनेलवर पाहिल्याचं तुमच्या स्मरणात नसेल… कसं असेल? असं काही कधी घडतच नाही… आंबे कापून खाता का चोखून, चहा बशीत फुंकून पिता की कपानेच, बिस्कीट बुडवून खाता की स्वतंत्रपणे, असे प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये ही हिंमत येईल कुठून?

ती अपेक्षा सोडा. गेलाबाजार देशात कोरोनाचे रूग्ण किती वाढले आहेत, किती गतीने वाढत आहेत, का वाढत आहेत, जगात आपण कितव्या क्रमांकावर आहोत, इथून पुढे काय परिस्थिती असेल, यावर तुम्ही एखाद्या चॅनेलवर पॅनेलचर्चा ऐकली आहे का? कोरोनाच्या संकटाने अधिकृतपणे ५ कोटी नोकऱ्या गेल्या आहेत, म्हणजे असंघटित क्षेत्रातले कामगार पकडले तर १० कोटी लोक म्हणजे देशाची एक दशांश लोकसंख्या बेरोजगार झाली आहे. हे सगळं का झालं आहे, कोणत्या धोरणांचा हा परिपाक आहे, यातून बाहेर पडण्यासाठी सरकार काय उपाययोजना करतंय, याची गंभीर चर्चा तुम्ही एखाद्या चॅनेलवर ऐकलेली आहे तुम्ही? 


हेही वाचा- ये क्या हो रिया है?

चीनने घुसखोरी करून तळ जमवला आहे, १९६२नंतर पहिल्यांदाच इतक्या गंभीर स्वरूपाची परिस्थिती भारत-चीन सीमेवर घडून येते आहे. मग देशाशी इतके दिवस खोटं का बोललं गेलं? अजूनही चीनचं नाव घेऊन बोलण्याची हिंमत आपल्यात का नाही? मुळात चीनला ही चिथावणी कशामुळे मिळाली, यावर कधी कोणाची मुलाखत किंवा गंभीर (जिच्यात संबित पात्राछाप सर्वपक्षीय प्रवक्ते नसतात अशी) पॅनेलचर्चा ऐकली आहे तुम्ही? 

हे झालं राष्ट्रीय पातळीवरचं. राज्यात कोरोनासंकटाच्या प्रारंभी आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत टीव्हीवरून राज्यातल्या परिस्थितीबद्दल माहिती देत होते, ते सगळं बंद झालं. आधी मुंबईत न आलेल्या एका वादळाने फोकस हलवला, मग मंदिराचे घंटानाद ऐकण्यात भक्त तल्लीन झाले आणि पाठोपाठ एका आत्महत्येच्या राजकारणाने सगळंच बदलून टाकलं… तो विषय अंगाशी येणार आहे, डोंगर पोखरून उंदीरही निघणार नाही, हे लक्षात येताच देशातल्या कोणत्याही साधूफकिराच्या झोळीत सापडेल त्यापेक्षा कमी गांजाची चर्चा सुरू झाली आणि ‘खून खून’ म्हणून ओरडणारे तेवढ्याच गांभीर्याने ‘गांजा गांजा’ असं ओरडू लागले… या गदारोळात आता राज्याच्या सरकारला, मंत्र्यांना कळीच्या विषयांवर बोलायची गरज राहिली नाही, त्यांना कुणी प्रश्न विचारताना तरी दिसतंय का? त्यावर चर्चा घडतायत का? जिथे यांनाच कुणी धारेवर धरत नाहीये तिथे कॅगच्या अहवालात ज्यावर ताशेरे आहेत त्या भरपूर जाहिरातबाजी केलेल्या जलयुक्त शिवार योजनेवरचा पैसा मुरला कुठे, हे कुणी विचारेल, अशी शक्यताही दिसत नाही.

…आता यावर आपण अत्युच्च पातळीवरून म्हणजे उंटाच्या पाठीवरून ‘माध्यमांचा घसरलेला दर्जा, टीव्हीवरची दर्जाहीन पत्रकारिता, पत्रकारिता नव्हे चाटुकारिता, हे कसले पत्रकार, ही तर गिधाडं, हा तर गोदी मीडिया किंवा हे तर घराण्याचे गुलाम पत्रकार’ वगैरे ठरलेल्या साच्यातल्या प्रतिक्रियांच्या शेळ्या हाकू… काहीही दाखवतात हो या टीव्हीवर बातम्यांच्या नावाखाली, असं म्हणू… पण, आपल्याला खरोखरच प्रिय असलेल्या व्यक्तीची शपथ घेऊन मनोमन फक्त इतकंच सांगा की वर सांगितलेले देशाच्या, तुमच्याआमच्या जगण्यामरण्याच्या दृष्टीने कळीचे असलेले विषय खरोखरच एखाद्या चॅनेलने किंवा माध्यमाने उचलले तर ते आपण पाहू का हो? 

आपल्याला टीव्हीवरच्या बातम्यांच्या नावाखाली दाखवल्या जाणाऱ्या खोट्या तमाशाची इतकी चटक लागली आहे की एखादा चॅनेल संजय दत्तच्या सुटकेनंतर ढोलताशा पथकापासून ते त्यांच्या तालावर नाचायला ज्युनियर आर्टिस्टांपर्यंत सगळा जामानिमा भाड्याने घेतो आणि त्याचं चित्रिकरण करून बघा मुंबईत कसा जल्लोष सुरू आहे अशी ‘बातमी’ पाचसहा तास खपवतो… दुसरा एक नमुना पाकिस्तानातल्या रिटायर्ड जनरल्सना डाॅलर्समध्ये पैसे देऊन आपल्या कार्यक्रमात फक्त शिव्या खायला बसवतो… ते तिकडे ऐश करतायत डाॅलरमध्ये… या कावळ्याच्या शिव्याशापांनी ना त्यांचं काही बिघडत ना त्यांच्या देशाचं काही बिघडत… इथे अनभिज्ञ प्रेक्षकांना मात्र आनंदाचं केवढं भरतं येतं की आपल्या वतीने कुणीतरी पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांसमोर पाकिस्तानची लाज काढतोय…

…या सगळ्याचा वापर करून सगळे राज्यकर्ते आपल्यासमोर असल्या भंगड बातम्यांचा खुळखुळा वाजवतात आणि आपण आपल्यासाठी महत्त्वाचे असलेले सगळे विषय विसरून कधी टाळ्या पिटतो, कधी दातओठ खातो, कधी कुणा निरपराधाच्या मरणाची कामना करतो तर कधी कुणा बलात्काऱ्याच्या नावाने जयघोष करतो…

…हे आपलं काय चाललं आहे? हे आपल्याला कसलं व्यसन लागलं आहे? केवढा विखार आणि विष भरून घेतो आहोत आपण आपल्या मनात आपल्याला ज्यांच्याविषयी कणभरही खरी माहिती नाही त्यांच्याबद्दल. केवढे आत्मविश्वासाने बोलतो आपण आपल्याला माहितीच नसलेल्या घटनांबद्दल. केवढ्या उतावीळपणे निकाल लावतो आपण आपल्यासमोर आलेल्या प्रत्येक प्रकरणाचा… हे चॅनेल उद्या एखाद्या निरपराध माणसाला लाइव्ह फाशी देतील, तर तीही आपण मिटक्या मारत पाहणार आहोत का?...

…काय म्हणता, नाही, अजिबात नाही. आपण काही असे विकृत नाही. आपल्याला सत्याची, न्यायाची चाड आहे?...

…मग हे चॅनेल नंबर वन कसे असतात? कोण आहेत हे लोक जे असले चॅनेल बघतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात…

…आपण शहाणे असू तर एकच लक्षात ठेवलं पाहिजे… के फाॅर कोणीही असो, आपण सी फाॅर कोरोना विसरता कामा नये… उद्या तो आपला श्वास कोंडेल तेव्हा आपले आचके के फाॅर कोणीहीच्या गदारोळात कुणाला ऐकूही जाणार नाहीत… ते संबंधितांना ऐकू जायचे असेल तर हा गदारोळ आपण आपल्या बाजूने आणि आपल्या परीने होता होईल तेवढा कमी केला पाहिजे.

हेही वाचा- वो तो है सटकेला!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा