Advertisement

शिवाजी पार्कमधल्या मधली गल्लीचा आणखी एक कौतुकास्पद उपक्रम

शिवाजी पार्कच्या मधली गल्ली रेसिडंट वेल्फेअर ग्रुपनं एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

शिवाजी पार्कमधल्या मधली गल्लीचा आणखी एक कौतुकास्पद उपक्रम
SHARES

घरी खुप जुने कपडे जमा झाले आहेत. काय करावं कळत नाही. काही कपडे आता होईनासे झालेत, तर काही घातले जात नाहीत. कपाटातल्या एखाद्या कोपऱ्यात ते पडून असतात.

पण, आपल्याला आवश्यक नसलेल्या याच गोष्टी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवता आल्या तर...याच भावनेतून शिवाजी पार्कच्या मधली गल्ली रेसिडंट वेल्फेअर ग्रुपनं एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठीही योगदान देणं आपलं कर्तव्यच आहे. असाच विचार करून शिवाजी पार्क इथली मधली गल्ली रेसिडंट वेल्फेअर ग्रुप काही ना काही उपक्रम राबवत असते. यावेळी ते डोनेशन ड्राइव्ह राबवणार आहेत. १७ जानेवारी म्हणजेच रविवारी होणाऱ्या या डोनेशन ड्राइव्ह अंतर्गत तुम्ही घरातील जुने कपडे त्यांना देऊ शकता.

शिवाजी पार्क इथल्या इंदू विला इथं मधली गल्ली रेसिडंट वेल्फेअर ग्रुपचे सदस्य उपस्थित असतील. या सदस्यांजवळ तुम्ही जुने कपडे देऊ शकता. फक्त जुने कपडेच नाही तर घरातील चादरी, बेडशीट, स्टेशनरी वस्तू जशा की पेन, पेन्सिल, नोटबुक, नोट पॅड, अल्युमिनियम आणि स्टिलच्या वस्तू असतील तर त्या देखील दान करू शकता. तुम्ही जे कपडे दान कराल ते चांगल्या स्थितीत असले पाहिजेत. फाटलेले कपडे स्विकारले जाणार नाहीत.

आम्ही दरवेळी काही ना काही हटके उपक्रम घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. गेल्यावेळी आम्ही चपला आणि ई कचरा गोळा करण्याचा उपक्रम राबवला होता. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता आम्ही गरजूंसाठी कपड्यांचं दान करा, अशी जनजागृती करत आहोत. यासाठीच आम्ही गूंजसोबत हातमिळवणी केली आहे.

वैभव रेगे, मधली गल्ली रेसिडंट वेल्फेअर ग्रुप    

मधली गल्ली रेसिडंट वेल्फेअर ग्रुपच्या सदस्यांनी काही दिवसांपूर्वी घरा-घरातील वापरात नसलेल्या चपला आणि ई-कचरा गोळा करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. जमा करण्यात आलेल्या चपला आणि ई-कचरा पुर्नप्रकियेसाठी Recyclekaro आणि green sole या कंपन्यांकडे पाठवला होता. यावेळी त्यांनी गूंज फाऊंडेशनसोबत एकत्र येत हा उपक्रम हाती घेतला आहे.


गूंजचं योगदान

गूंज (goonj.org)हा भारतातल्या टॉप १० एनजीओजपैकी एक आहे. याचं प्रमुख केंद दिल्लीला आहे. गूंजची सुरूवातही १९९९ साली अंशू गुप्ता यांनी केली. या एनजीओतर्फे पूरग्रस्तांना मदत, मानवीय मदत आणि समाज विकासाचं कार्य केलं जातं.

कधी : १७ जानेवारी २०२१, रविवारी

वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ५

स्थळ : प्लॉट नंबर ५१, इंदू विला, डॉ. एम.बी.राऊत रोड, शिवाजी पार्क, दादर
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा