Advertisement

हेल्पफूल 'अल्पो'प्रहार

आजच्या धावत्या जगात परक्यांसाठी वेळात वेळ काढून मदतीचा हात देणं खरंच कौतुकास्पद आहे. हे जोडपे खऱ्या अर्थानं हिरो आहेत.

हेल्पफूल 'अल्पो'प्रहार
SHARES

आपल्यापैकी बहुतांश मुंबईकर हा सकाळचा नाष्टा रेल्वे स्टेशनजवळील स्टॉल्सवर करतात. या स्टॉल्सवर उत्तम प्रकारचे पोहे, उपमा, इडली असे पदार्थ उपलब्ध असतात. हा व्यवसाय करणारे विक्रेता महिन्याला अधिक इनकम म्हणून हा व्यवसाय करतात. तर त्यापैकी काहींचं घरच या व्यवसायावर चालतं. एकूण काय तर ते स्वत:साठी या व्यवसायात उतरलेले असतात.

पण आज आम्ही तुमची ओळख अशा एका जोडप्याशी करून देणार आहोत ज्यांचा कांदिवली स्टेशनबाहेर पोहा, उपमा, थेपले याचा स्टॉल आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन. बाकिच्यांसारखे त्यांचे देखील स्टॉल आहेत. पण हा स्टॉल त्यांनी स्वत:साठी नाही तर त्यांच्या घरात जेवण बनवणाऱ्या काकूंसाठी सुरू केला आहे.

शहा जोडपे हे सामाजिक कार्य करता करता एका खाजगी कंपनीत नोकरी देखील करतात. चकीत झालात ना? काय भानगड आहे असाच प्रश्न डोक्यात आला असेल.

आर्थिक मदतीसाठी हातभार

अंकुश आणि अश्विनी शहा या जोडप्यानं कांदिवली स्टेशनजवळ सुरू केलेल्या स्टॉलवर उपमा, पोहा, थेपले, ढोकळा असे पदार्थ उपलब्ध असतात. या स्टॉलवर शहा जोडपे हे पदार्थ विकत असले तरी हे सर्व पदार्थ त्यांनी नाही तर त्यांच्या घरात जेवण बनवणाऱ्या भावना यांनी बनवले आहेत. शहा कुटुंब आर्थिक मदत म्हणून भावना यांनी बनवलेले पदार्थ स्टॉलवर विकतात. हे पदार्थ विकून आलेले सर्व पैसे ते भावना यांना देतात.

सकाळी लवकर शहा जोडपे अन्नपूर्णा या त्यांच्या स्टॉलवरील सर्व पदार्थ विकतात. त्यानंतर हे जोडपे स्वत:च्या कामाला निघून जातात. शहा जोडपे दोघेही मार्केटिंग क्षेत्रात नोकरी करतात. स्टॉल तर ते भावना यांच्यासाठी चालवतात. 

स्वाभिमानानं जगण्यासाठी धडपड

खरंतर भावना यांनी बनवलेले पदार्थ स्टॉलवर विकण्याची संकल्पना शहा यांनीच भावना यांना दिली. भावना या शहा यांच्याकडे जेवण बनवण्याचं काम करतात. पण त्या नेहमी टेंशनमध्ये असायच्या. जेव्हा शहा जोडप्यानं त्यांना याचं कारण विचारलं तर त्यांनी घरची आर्थिक परिस्थिती खराब असल्याचं सांगितलं. शहा जोडप्यानं त्यांना आर्थिक मदत म्हणून पैसे देण्याचं ठरवलं. जेणेकरून त्यांना मदत होईल. पण भावना यांनी अशा प्रकारे आर्थिक मदत घेण्यास नकार दिला.

पैसे नको, पण काम द्या 

आम्ही त्यांना काही पैशांची मदत करण्याचं ठरवलं. तसं भावना यांना सांगितलं. पण त्यांचं उत्तर ऐकून आम्ही चकितच झालो. त्या म्हणाल्या, मी लहानपणापासून हालाकित आयुष्य काढलं. पण कोणापुढे कधी पैशासाठी हात पसरले नाहीत.

आजपर्यंत कुणी माझ्या दारात पैशासाठी आलं नाही. मला माझं आयुष्य स्वाभिमानानं जगायचं आहे. त्यामुळे तुम्ही मला पैसे नका देऊ. पण काम द्या. घरचं काम, जेवणाच्या ऑर्डर अशी कामं करून मी पैसे कमवीन. हे ऐकून आम्हाला त्यांचा अभिमान वाटला.

अश्विनी शहा

कशी सुचली संकल्पना?

यानंतर शहा जोडप्याला संकल्पना सुचली की, भावना यांनी बनवलेले पदार्थ स्टेशनजवळील स्टॉलवर विकायला ठेवायचे. त्यांनी ही संकल्पना भावना यांना सांगितली आणि त्या यासाठी तयार झाल्या.

यासाठी त्या सकाळी २.३० वाजता उठतात. ३ वाजता सर्व बनवण्यासाठी सुरुवात करतात. सहा वाजेपर्यंत सर्व तयार होतं. त्यानंतर शहा जोडपे हे सर्व बनवलेले पदार्थ घेऊन कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ स्टॉलवर जातात आणि तिथे या सर्व पदार्थांची विक्री होते.

खरंतर आम्ही जे करतोय ते काहीच नाही. खरी मेहनत भावना बेहनची आहे. कारण ज्या वयात लोकं निवृत्त होतात. त्या वयात त्यांना खूप काम करावं लागतंय. त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

अंकुश शहा

हालाकीच्या परिस्थितीशी दोनहात

भावना यांच्या पतींना काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. पण ते बऱ्यापैकी चालू शकत होते. पण घरातच पडल्यामुळे त्यांच्या कंबरेला दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर त्याचं चालण बंदच झालं. त्यांच्या ऑपरेशनसाठी ३-४ लाखांचा खर्च आहे. त्यासाठी देखील ते पैसे जमवत आहेत.

भावना यांना दोन मुलं देखील आहेत. पण मुलांचा मिळणारा पगार घराचं भाडं देण्यातच संपतो. त्यामुळे भावना शहा जोडप्यांव्यतिरिक्त आणखी ३-४ घरांमध्ये जेवण बनवण्याचं काम करतात.  



आजच्या धावत्या जगात परक्यांसाठी वेळात वेळ काढून मदतीचा हात देणं खरंच कौतुकास्पद आहे. हे खऱ्या अर्थानं हिरो आहेत.      

स्टॉलचा पत्ता : डॉ. दळवी रोड, जेठवा नगर, सरोवर रेस्टॉरंटच्या समोर, बनारसी चहाच्या स्टॉलच्या बाजूला, कांदिवली रेल्वे स्टेशन

फेसबुक पेज : अन्नपूर्णा पराठा स्टॉल 


हेही वाचा

चिमुकल्यांच्या पोटाची आग शमवणारे 'अन्नदाता'

अशी आहे मुंबईतील ऑक्सीजन देणारी रिक्षा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा