Advertisement

मला न मिळालेली चौथी सीट!

अरे! मी त्या चौथ्या सीटसाठी गोरेगावला चढल्यापासून चारवेळा विचारलं होतं. ती जागा तुम्ही वांद्रेमध्ये चढलेल्या मुलीला देता कारण ती तुमच्या ग्रुपमधली आहे. कहर म्हणजे वांद्रेला चढलेल्या मुलीला चौथ्या सीटवर बसायचं नव्हतं. म्हटलं मी बसेन. पण कसलं काय? खिडकीजवळ बसलेल्या महिलेनं तिच्या ग्रुपमधल्या महिलेला सर्वात आधी बसण्यासाठी आपली जागा दिली होती.

मला न मिळालेली चौथी सीट!
SHARES

ट्रेनमधील महिलांची ग्रुप दादागिरी नवी नाही. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव आल्यावर इतर महिला प्रवाशांच्या व्यथा कळाल्या. मी गोरेगाव स्थानकावरून ९.३१ ची लोकल ट्रेन पकडली. सर्वसाधारणपणे लोकलमधील एका सीटवर ४ प्रवासी सहजपणे बसतात, पण मी ज्या डब्यात शिरले होते त्या डब्यातील सीटवर केवळ तीन महिला प्रवासी बसल्या होत्या. चौथ्या सीटवर बसायला थोडी जागा होती. त्यामुळे चौथ्या सीटवर बसायला मिळेल या आशेनं मी त्यांना थोडं सरकायला सांगितलं. तर "सरकायला जागाच नाही. फोर्थ सीटवर नाही बसता येणार". असं म्हणत या महिलांची ग्रुप दादागिरी सुरू झाली

त्यातल्या एका मुलीला मी विचारलं, कुठे उतरणार? तर म्हणाली वांद्रे. मी तिला म्हटलं ठिक आहे. मग चौथ्या सीटवर मी बसेन. तर तिनं काहीच उत्तर दिलं नाही. आपली सीट कन्फर्म करायला म्हणून मी तिला पुन्हा विचारलं. तर म्हणाली, "नाही त्यांनी सांगितलं आहे.” अर्थात जिनं सांगितलं ती तिच्याच ग्रुपची महिला होती. मी तरी तिला म्हटलं तिसरी सीट सांगितली ना? मी फोर्थ सीटचं म्हणतेय. तिनं आधीसारखं दुर्लक्ष केलं

तेवढ्यात अंधेरीला खिडकीजवळील सीटवरील महिला उठली आणि ग्रुपमधल्या एका दुसऱ्या मुलीला थोडावेळ बसायला दिलं. त्या महिलेला बसायला दिल्यावर चौथ्या सीटसाठी जास्त जागा झाली. पण तिसऱ्या सीटवरील महिला सरकतच नव्हती. जागा होणार नाही, हेच सुरू होतं. शेवटी तिसऱ्या सीटवरील महिलेला वांद्र्याला उतरायचं असल्यानं ती उठली. तिची सीट तिच्याच ग्रुपमधल्या एका महिलेनं सांगितली होती

सो, ती तिथं बसली. तिनं ती सीट बूक केली होती ती बसली. पण पुन्हा प्रश्न आला चौथ्या सीटचा. चौथी सीट पुन्हा रिकामी. चौथ्या सीटवर बसायला जाणार, तर तर पुन्हा त्यांचा ना... ना चा पाढा सुरू झाला. ही पण सीट सांगितली आहे. त्यांच्याच ग्रुपमधील एक महिला बसणार होती. पण कमी जागेत तिला बसायला जमत नव्हतं. त्यामुळे तिनं ती सीट वांद्रेमध्ये चढलेल्या एका त्यांच्याच ग्रुपमधल्या मुलीला बसायला दिली.

अरे! मी त्या चौथ्या सीटसाठी गोरेगावला चढल्यापासून चारवेळा विचारलं होतं. ती जागा तुम्ही वांद्रेमध्ये चढलेल्या मुलीला देता कारण ती तुमच्या ग्रुपमधली आहे. कहर म्हणजे वांद्रेला चढलेल्या मुलीला चौथ्या सीटवर बसायचं नव्हतं. म्हटलं मी बसेन. पण कसलं काय? खिडकीजवळ बसलेल्या महिलेनं तिच्या ग्रुपमधल्या महिलेला सर्वात आधी बसण्यासाठी आपली जागा दिली होती. त्या जागी मॅडम पुन्हा विराजमान झाल्या. त्यामुळे फोर्थ सीटला बसायला थोडी कमी जागा होती. पण तरीही थोडं बसता आलं असतं. पण दादर स्टेशन जवळ आलं होतं. त्यामुळे मी बाहेर आले.  

प्रत्येकवेळी कारणं देऊन चौथ्या सीटवर बसायलाच दिलं नाही. स्वत:च्या ग्रुपमधल्या महिलांसाठी बरं तुम्ही अॅडजस्ट करता. काही महिलांच्या पायामध्ये एवढा गॅप असतो जणू स्वत:च्या घरी बसल्या आहेत. मुद्दामून पाय फाकून बसतात. जेणेकरून स्वत:ची जागा ग्रुपमधल्या दुसऱ्या महिलेला दिली तर तिला त्या जागेत मावता यावं आणि आरामात बसायला यावं. माझ्यासारखं अनेकांनी हे अनुभवलं असणार

महिलांच्या डब्यात तर हे चालतंच पण पुरुष देखील यात काही मागे नसतात. मध्यंतरी पुरुषांच्या डब्यातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत चक्क चार-पाच जणांच्या एका ग्रुपनं एका प्रवाशाला मारहाण केली होती. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वेमध्ये तर हे सर्रास चालतं. पण याचा नाहक त्रास इतर प्रवाशांनाही होतो.

लोकल गाड्यांमध्ये प्रवाशांचे अनेक ग्रुप तयार झाले आहेत. अनेक ग्रुपवाल्यांनी तर स्वयंघोषित नियमच तयार केले आहेत. उशिरा येणाऱ्या सहकारी प्रवाशांसाठी जागा आरक्षित करण्याचे काम जणू याच मंडळींकडे असते. त्यामुळे आधी येऊनही काही प्रवाशांना जागा मिळत नाही. जागा राखून ठेवण्यासाठी बेंचवर बॅगा ठेवल्या जातात. कधी मुद्दामून पायांमध्ये गॅप टेवला जातो. जेणेकरून चौथी सीट अडवून ग्रुपमधील एखादा तिकडे बसू शकेल. याचा विरोध केला की ग्रुपमधील सर्वच तुटून पडतात. ग्रुपमधील प्रवासी इतर प्रवाशांना दमदाटी करतात, प्रसंगी मारहाण करतात, अशी अनेक प्रवाशांची तक्रार आहे.

ट्रेनमध्ये अशा प्रकारे गुंडागर्दी करणाऱ्यांना चाप बसायलाच हवा. रेल्वेनं याविरोधात कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी बरखा मेघानी या तरूणीनं दादागिरी करणाऱ्या महिलांविरोधात आवाज उठवला होता. अंबरनाथ स्टेशनवरून सुटणाऱ्या लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात सात महिला बरखाला नेहमी बसण्याच्या जागेवरून त्रास द्यायच्या

एक महिना त्रास सहन केल्यानंतर अखेर बरखानं ७ महिलांविरोधात रेल्वे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत घेत रेल्वे पोलिसांनी ७ महिलांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली. तुमच्यासमोर अशा घटना घडत असतील त्याच्याविरोधात आवाज उठवा. या महिलांचा फोटो किंवा व्हिडिओ काढा. हा व्हिडिओ रेल्वे पोलिसांना देऊन त्यांच्याविरोधात तुम्ही तक्रार करू शकता



हेही वाचा-

माझा बापमाणूस!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा