लोकलमधील घाईगडबडीच्या प्रवासात अनेक प्रवासी बॅग अथवा इतर साहित्य विसरतात. मात्र हेच साहित्य त्या संबधित व्यक्तींशी संपर्क करून पोहचवण्यात रेल्वेचे कर्मचारी, पोलिस कधीही चुकत नाहीत. याचा अनुभव आजपर्यंत अनेक प्रवाशांना आला आहे. नुकताच हा अनुभव कॅन्सरवर मात करणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीला आला. रेल्वेतून प्रवास करताना आपल्या आजारावर सुरू असलेल्या उपचारांची कागदपत्रे ही तरुणी लोकलमध्ये विसरली. मात्र त्या फाइलचे महत्व ओळखून स्टेशन मास्तरांनी तिची ती फाईल तिच्याजवळ सुपूर्द केली.
नवी मुंबईच्या न्यू पनवेल परिसरात राहणारी खुशी सोनार ही पोटाच्या कॅन्सर ग्रस्त आहे. तिच्यावर जानेवारी 2018 मध्ये टाटा मेमोरिअल रुग्णालयात शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. दर सहा महिन्यांनी खुशीला वैद्यकिय तपासणीसाठी रुग्णालयात यावं लागातं. गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास १३ वर्षांची खुशी तिच्या आईसोबत टाटा मेमोरिअल रुग्णालयात उपचारासाठी निघाली होती.
शिवडी स्थानकावर उतरताना खुशीची तिची पिशवी लोकलमध्ये विसरली. तिच्यावर उपचार सुरू असलेली फाइल आणि एका संस्थेकडून मदत स्वरूपात मिळालेले दहा हजार रुपये त्या पिशवीत होते. लोकल सुटल्यानंतर हीबाब दोघी मायलेकींच्या लक्षात आली. अत्यंत महत्त्वाची फाइल ट्रेनमध्ये राहिल्यामुळे दोघीही मानसिक तणावाखाली होत्या. वेळीच दोघींनी स्टेशन मास्तर विनायक शेवाळे यांच्या कचेरीकडे धाव घेत मदत मागितली.
शेवाळे यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. माझ्या मुलीवर आतापर्यंत झालेल्या वैदयकीय उपचारांची माहिती त्यात आहे. ही त्यातील प्रत्येक कागद हा महत्वाचा आहे. त्यामुळेही फाइल मिळाली नसती. तर आमचे खूप नुकसान झाले असते.
साधना सोनार, पीडितेची आई
शेवाळे यांनी वेळ न दवडता. संबधित लोकल ज्या ज्या स्थानकावर थांबते त्या स्थानक मास्तरांशी संपर्क साधत त्यांना सतर्क केलं. ही लोकल अर्धातासांनी पुन्हा त्याच स्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेवाळे यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीनं सोनार यांची फाईल अर्धातासात परत मिळवून दिली. शेवाळे यांच्या या तत्परतेची दखल घेत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.