Advertisement

मुंबईतील हा अवलिया चालवतोय 'सलून वाचनालय'

मुंबईतील या सलूनमध्ये तुम्ही दाढी, केस कापून घेऊ शकता. पण त्यासोबत तुम्ही वाचन देखील करू शकता. कारण हे आहे 'सलून वाचनालय'...

मुंबईतील हा अवलिया चालवतोय 'सलून वाचनालय'
SHARES

हातात पुस्तकं, पुस्तकांमध्ये गुंतलेली मंडळी, हो अगदी बरोबर वाचलंत मोबाईलमध्ये नाही तर पुस्तकात गुंतलेलीच लिहलंय. एकंदर चित्र वाचनालयातील आहे असं तुम्हाला वाटेल. पण पुस्तकात डोकं खुपसून बसलेल्या मंडळींपुढे आणखी एक चित्र दिसेल ते म्हणजे केस कापणारे बार्बर. हे वाचून थोडं थबकला असाल. एकच मिनिटं वाचनालयातून थेट सलूनमध्ये? असं कसं? नेमकी भानगड काय आहे? असे प्रश्न एक-एक करून तुमच्या डोक्यात टिक-टॉक करत असतील.

आता यामधलं गुपित म्हणजे हे कुठलं वाचनालय नाही बरं. ते एक सलूनच आहे. हो अगदी योग्य वाचलत. सलून... तेच सलून जिथे रविवारी किंवा कधीही तुम्ही केस कापायला, दाढी करायला जाता. तिथं गेल्यावर लाईन ही असतेच. आता तिथं थांबून काय करणार? तर आपसुकच खिशातील मोबाईल हातात येतो आणि मग काय? नंबर येईपर्यंत त्यातच तुम्ही गुंतलेले असता. पण कांजुरमार्ग इथलं सलून मात्र याला अपवाद आहे. कारण हे सलून कम वाचनालय झालंय.

'अशी' सुचली सकल्पना

सामाजिक कार्यकर्ते कम सोशल बार्बर अशी ओळख असलेले रवींद्र बिरारी यांनी एक अनोखी संकल्पना राबवली आहे. सलूनमध्येच त्यांनी एक छोटसं वाचनालय सुरू केलं आहे. आहे की नाही भन्नाट आयडिया? डॉ. मनोज चव्हाण हे रवींद्र यांच्याकडे केस कापून घेण्यासाठी येतात. मनोज चव्हाण यांनीच ही संकल्पना रवींद्र यांना सांगितली. 

मुळची युरोपीय संकल्पना

मनोज यांनी यांनी सांगितलेली संकल्पना ही युरोपीय आहे. पण तामिळनाडूत एका बार्बरनं ही संकल्पना राबवली आहे. पण महाराष्ट्रात आणि मुंबईत ही संकल्पना कुणीच राबवली नाही. त्यामुळे मी हा उपक्रम मुंबईत सुरू केला. 

- रवींद्र बिरारी, बार्बर


वाचनालयात किती पुस्तकं?

रवींद्र बिरारी यांच्या सलूनमध्ये येणारे आता हातात मोबाईल नाही तर पुस्तकं चाळतात. त्यांच्या वाचनालयात तुम्हाला ७५ ते ८० पुस्तकं ठेवलेली दिसतील. पुस्तकं ठेवण्यासाठी त्यांनी खास सोय देखील केली आहे. वाचनालयात लावावीत तशी पुस्तकांची व्यवस्था केली आहे. कर्ण, संविधान, स्वामी विवेकानंद, अब्दुल कलाम यांच्यासारखी प्रेरीत करणारी पुस्तकं त्यांच्या वाचनालयात आहेत. 


मोबाईलला द्या ब्रेक

आजची पिढी ही मोबाईलच्या आहारी गेली आहे. जिथे-तिथे त्यांना मोबाईल हातात लागतो. मोबाईल वापरणं यात काही गैर नाही. पण त्याचा किती वापर करणं किंवा त्याच्या किती आहारी जाणं, हे कळालं पाहिजे. पण या मोबाईलच्या नादात आपल्या वाचनसंस्कृतीला कुठे ना कुठे धक्का बसत आहे. या उपक्रमाच्या मदतीनं सलूनमध्ये येणारे तरी पुस्तकं वाचतील.

रवींद्र बिरारी, बार्बर

कलाकारांचाही पाठिंबा

विशेष म्हणजे त्यांच्या या उपक्रमात कलाकारांनी देखील पाठिंबा दिला आहे. अभिनेता विक्रम गोखले हे देखील रवींद्र बिरारी यांच्यात कार्यात त्यांना हातबार लावणार आहेत. विक्रम गोखले यांनी स्वत: कडची पुस्तकं सलूनमधील वाचनालयात ठेवण्याची इच्छा देखील रवींद्र बिरारी यांच्याकडे व्यक्त केली आहे. विक्रम गोखले यांच्यासारखे अनेक कलाकार रवींद्र यांना साथ देतात. 

वाचाल तर वाचाल 

दिवसेंदिवस मोबाईल आणि सोशल मीडियाच्या नादात आपण आपली वाचन संस्कृती विसरत चाललो आहोत. पण रवीद्र बिरारी यांच्यासारखे अवलिया ही वाचन संस्कृती टिकवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. आता त्यांच्या सलूनमध्ये येणाऱ्यांच्या हातात मोबाईल नाही तर पुस्तकं दिसतात. त्यामुळे रवींद्रहे आपल्या हेतूत कुठे ना कुठे यशस्वी ठरले आहेत. 





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा