Advertisement

महाराष्ट्राच्या चित्ररथानं वेधलं सर्वांचं लक्ष, ठरला लोकप्रिय चित्ररथ

चित्ररथांपैकी महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ हा पुरस्कार मिळाला आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथानं वेधलं सर्वांचं लक्ष, ठरला लोकप्रिय चित्ररथ
SHARES

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांपैकी महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ हा पुरस्कार मिळाला आहे. सीआयएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलीस फोर्समधील चित्ररथ म्हणून सन्मानित करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिलीय.

एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यंदा संचलनात जवळपास १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २१ चित्ररथ सहभागी झाले होते.

त्याचप्रमाणे भारतीय नौदलाच्या चित्ररथाला सर्व सेवा दलांमधील सर्वोत्तम चित्ररथाचा मान मिळालाय. तर याच गटामधील सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ म्हणून हवाई दलाच्या चित्ररथाला गौरवण्यात आलं आहे.

मंत्रालयांच्या चित्ररथांपैकी शिक्षण मंत्रालय आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या चित्ररथांना पुरस्कार विभागून देण्यात आलाय. यंदाच्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये वाराणसी काशी विश्वनाथ धामचा देखावा साकारण्यात आलेला. तर यंदा महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठार दाखवण्यात आलं होतं.

महाराष्ट्राच्या चित्ररथावर पाच “जैवविविधता मानकं” दाखवण्यात आलेली. ज्यात राज्यासाठी अद्वितीय असलेल्या वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश होता. सुमारे १५ प्राणी आणि २२ वनस्पती आणि फुले या चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आलेले.

चित्ररथासाठी एक विशेष गाणेही तयार करण्यात आले होते. या गाण्याद्वारे झाडे लावा, झाडे जगवा हा विशेष संदेश देण्यात आला होता.

महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांची होती. या चित्ररथाला प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी आवाज दिला होता.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा