एक बालदिन असा ही !


SHARE

14 नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण भारतात बालदिन साजरा केला जात आहे. असे म्हटले जाते की आजची लहान मुले हीच देशाचे भविष्य घडवतात. पण आता याच लहान मुलांनी उद्या नाही तर आतापासून देशातील छोट्या-मोठ्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आपल्या हातात घेतली आहे. एकीकडे स्थानिक प्रशासन आपली जबाबदारी पार पाडायला अनेकदा विसरते. पण या लहान मुलांनी स्थानिक प्रशासनाला त्यांची जबाबदारीची आठवण करून दिली आहे.


लहान मुलांनी पोलिसांकडे मांडली समस्या

मालाडच्या मालवणी परिसरात असलेल्या उत्कर्ष शाळेच्या विद्यार्थ्यांनी ट्रॅफिकची समस्या स्थानिक पोलीस स्टेशमध्ये जाऊन मांडली. या परिसरात ट्रॅफिकची समस्या डोकेदुखी बनत चालली आहे. लहान मुलांना रोज शाळेत जाताना ट्रॅफिकच्या अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या मुलांना कधीकधी शाळेत जायलाही उशीर होतो.


पोलिसांना पत्र लिहून केली तक्रार

इथल्या रहिवाशांनी अनेकदा याची तक्रार स्थानिक प्रशासनाकडे केली. पण यावर अजूनही कोणताच तोडगा निघालेला नाही. आता ही समस्या सोडवण्याची जबाबदारी या लहान मुलांनी घेत पोलिसांना एक पत्र लिहून तक्रार केली आहे. मालवणी गेट नंबर पाच पासून ते अंबूजवाडी आणि युसूफ पटेल रोडवर वाहतूक कोंडी होते. येथे अनेकदा स्कूल बसच काय तर रुग्णवाहिका देखील ट्रॅफिकमध्ये अडकून पडतात.

उत्कर्ष शाळेचे प्राचार्य फिरोज शेख म्हणतात, विद्यार्थांनी संबंधित पोलीस आणि वाहतूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून मागणी केली आहे की, दुर्घटनेपासून बचाव करण्यासाठी अनधिकृत फेरीवाले आणि अवैध पार्किंगला रोकण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जावी.

संबंधित विषय