SHARE

अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते थेट स्थानिक पालिका प्रशासनापर्यंत सर्वच जण शहरांना स्मार्ट बनवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. पण मुंबईतली एक हरहुन्नरी व्यक्ती मात्र गावांना स्मार्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यानं कंबर कसली आहे!

योगेश साहू. एम इंटलेक्ट ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सीईओ. योगेश साहू यांनी गावांना स्वावलंबी बनवण्याचं स्वप्न बघितलंय. आणि या स्वप्नाला त्यांनी नाव दिलंय 'स्मार्ट गाव'. 'स्मार्ट गाव' नावाचं एक मोबाईल अॅप्लिकेशन योगेश साहूंनी तयार केलं आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये असलेलं हे अॅप्लिकेशन ग्रामीण भागात राहाणाऱ्या लोकांना त्यांचा व्यवसाय, उत्पादनं आणि शेतीविषयक ज्ञान यामध्ये मदत करणार आहे. उत्तर प्रदेशमधल्या एका गावामध्ये प्रायोगिक तत्वावर त्यांनी या अॅप्लिकेशनचा वापर सुरूही केला आहे.


कशी झाली सुरुवात?

भारतात एकीकडे गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य पुरेशा वितरण व्यवस्थेअभावी पडून राहून खराब होतं. तर दुसरीकडे त्याच अन्नधान्याच्या पुरेशा पुरवठ्याअभावी किंमती वाढत आहेत. याच समस्येवर उपाय शोधण्यासाठी योगेश यांनी त्यांचं ज्ञान अर्थात टेक्नोलॉजी वापरून एक अॅप्लिकेशन बनवण्याचा निर्णय घेतला. यासोबतच, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, सरकारी मदत, शेतीविषयक ज्ञान आणि त्यांच्या मालासाठी योग्य किंमत या गोष्टीही त्यांना साध्य करायच्या होत्या.


कसं अस्तित्वात आलं 'स्मार्ट गाव'?

ग्रामीण भागातली खरी समस्या समजल्यानंतर त्यांनी त्यांच्यासारखाच विचार करणाऱ्या त्यांच्या मित्राशी चर्चा केली. 'स्मार्ट गाव' अॅप्लिकेशन तयार करण्यासाठी त्यांनी त्यांचं उत्तर प्रदेशातील मूळ गाव तौढकपूरमधल्या स्थानिक ग्रामपंचायत आणि समित्यांशी चर्चा केली. त्यांच्या आणि गावकऱ्यांच्या सूचनांचा समावेश करून अखेर 'स्मार्ट गाव' अॅप्लिकेशन मोबाईल डाऊनलोड करण्यासाठी तयार झालं. आणि आता भारतातील सर्व गावं एकमेकांशी जोडण्याच्या या योजनेला सरकारचा पाठिंबा मिळावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत.


कसं चालतं 'स्मार्ट गाव' अॅप्लिकेशन?

'स्मार्ट गाव' हे अॅप्लिकेशन हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. या अॅप्लिकेशनच्या मदतीने ग्रामीण भागातील जनता त्यांची शेतीशी संबंधित आणि इतर उत्पादनं थेट शहरांमध्ये असलेल्या ग्राहकांना विकू शकतात. त्यामुळे नफ्याचा सर्वाधित हिस्सा खाणाऱ्या मध्यस्थांचा अडसर दूर होणार आहे. याशिवाय तक्रारी दाखल करणे आणि सरकारी योजनांची माहिती मिळणे असेही फायदे या अॅप्लिकेशनवरून होणार आहेत.

योगेश साहू गेल्या १३ वर्षांपासून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असून अनेक भारतीय आणि परदेशी कंपन्यांसोबत त्यांनी काम केलं आहे. एका सामान्य मध्यमवर्गीय पण पुरोगामी कुटुंबात लहानाचे मोठे झालेल्या योगेश साहूंन हा विश्वास आहे की ग्रामीण भागात तंत्रज्ञानाची जोड दिल्यास गावं खरंच स्मार्ट आणि प्रगत होऊ शकतात. कदाचित योगेश साहूंचा हा 'स्मार्ट गाव प्रोजेक्ट' भारताला पुन्हा महात्मा गांधींना पाहिलेल्या समर्थ गावांच्या स्वप्नाकडे घेऊन जाईल!

संबंधित विषय
ताज्या बातम्या