Advertisement

कॅन्सरचा नेम चुकवणारे रायफल शूटर! माॅस्कोत २१ पदकांची लयलूट


कॅन्सरचा नेम चुकवणारे रायफल शूटर! माॅस्कोत २१ पदकांची लयलूट
SHARES

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१३ मध्ये वयाच्या चौथ्या वर्षी काव्या सगळगिळे या मराठमोळ्या चिमुरडीला रक्ताचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. अाई-वडिलांसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. पण काव्याने उमेद गमावली नाही. अापली मुलगी एकेदिवशी अांतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करेल अाणि पदक मिळवून घरी येईल, असं तिच्या अाईला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण काव्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे हे शक्य झालं. रशियाची राजधानी माॅस्को इथे कॅन्सर सर्व्हायवर मुलांसाठी अायोजित करण्यात अालेल्या ‘वर्ल्ड चिल्ड्रेन विनर्स गेम्स’ या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या नऊ कॅन्सर सर्व्हायव्हर भारतीय मुलांनी बक्षिसांची लयलूट केली. या खेळाडूंनी बुद्धिबळ, टेबलटेनिस, जलतरण, रायफल शूटिंग, धावणे अाणि फुटबाॅल या सहा क्रीडा प्रकारांमध्ये तब्बल २२ पदके पटकावली. विशेष म्हणजे रायफल शूटिंगमध्ये त्यांनी चार पदकांची कमाई केली.



अाठवड्यातून चार दिवस सराव

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात या नऊ खेळाडूंचा शूटिंग रेंजचे प्रशिक्षक जितेश कदम अाणि स्नेहल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव सुरू होता. ८ ते १६ वयोगटातील मुलांनी याअाधी हातात कधीही रायफल पकडली नव्हती. पण त्यांच्यात जिद्द होती. रोज शाळेत जाऊन अाल्यानंतर अाठवड्यातून चार दिवस ही मुले रायफल शूटिंगचा सराव करत होती, असे रेंजचे प्रमुख जितेश कदम यांनी सांगितले. टाटा मेमोरियल सेंटरच्या ‘इम्पॅक्ट फाऊंडेशन’ या सेवाभावी संस्थेने या नऊ मुलांना क्रीडा स्पर्धेसाठी माॅस्कोला पाठवलं होतं.


एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून गेल्या पाच वर्षांपासून आम्ही दरवर्षी कॅन्सर सर्व्हायव्हर मुलामुलींना या स्पर्धेसाठी रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारात मार्गदर्शन करतोय. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी या मुलामुलींसाठी रायफल शूटिंग रेंजच्या सुविधा, अगदी परदेशी बनावटीच्या रायफल्ससुद्धा अत्यल्प शुल्क आकारून उपलब्ध करून दिल्या होत्या.
- स्नेहल कदम, रायफल शूटिंग प्रशिक्षिका.


या खेळाडूंची गगनभरारी

मुंबई, ठाणे परिसरातील भार्गव जैन, काव्या सगळगिळे, गर्विल प्रतिक, कुणाल महामुनी, इब्ने अली, रितिक अंदे, मोहम्मद अन्सारी या सात जणांनी तर तेलंगणाचा झोहेर धिनोजवाला अाणि मध्य प्रदेशचा मिहिर सिंग यांनी या अांतरराष्ट्रीय स्पर्धेत अापली छाप पाडली. “नियमित वैद्यकीय पाठपुराव्यामुळे लहान मुलांमधील कॅन्सर पूर्णपणे बरा होतो, इतकंच नव्हे तर ही मुलं पुन्हा एकदा सुंदर आयुष्य जगू शकतात, हे या छोट्या नेमबाजांनी सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी मिळवलेलं यश हे समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असा विश्वास स्नेहल यांनी व्यक्त केला.


हेही वाचा -

ब्रेबाॅर्न स्टेडियममध्ये सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी

मुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा