Advertisement

सह्याद्री, श्री सिद्धी आणि चेंबूर क्रीडा केंद्राची विजयी सलामी


सह्याद्री, श्री सिद्धी आणि चेंबूर क्रीडा केंद्राची विजयी सलामी
SHARES

ओम भारत क्रीडा मंडळ आणि शिवसेना शाखा क्र. 94-94 च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेत सह्याद्री क्रीडा मंडळ, श्री सिद्धी आणि चेंबूर क्रीडा केंद्राने विजयी सलामी दिली. पहिल्या तिन्ही लढती अटीतटीच्या खेळल्या गेल्या. मॅटवर खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत प्रो कबड्डी लीगचे नवे नियम लागू असल्याने सामने चुरशीचे होत आहेत. पहिल्याच लढतीत जोगेश्वरीच्या सह्याद्री क्रीडा मंडळाने सन्मित्र क्रीडा मंडळ घाटकोपर संघावर 32-30 असा केवळ 2 गुणांनी विजय मिळवत आगेकूच केली. सौरभ चव्हाण याच्या दमदार चढाया आणि सौरभ पार्टे याच्या पकडीची त्याला लाभलेली साथ यामुळे मध्यंतरालाच त्यांनी 15-10 आघाडी घेतली होती.

उत्तरार्धात मात्र अंकुश साळवी याच्या चढायांमुळे सन्मित्र संघाने जोरदार पुनरागमन केले. मात्र संघाला विजयी करण्यात तो अपयशी ठरला. श्री सिद्धी आणि संघर्ष क्रीडा मंडळ घाटकोपर यांच्यात मध्यंतराला 8-8 अशी बरोबरी होती. पण उत्तरार्धात श्री सिद्धी संघाने प्रतिस्पर्धी संघापेक्षा 2 गुण जास्त मिळवत ही लढत 16-14 अशी जिंकली. अनिकेत पार्लेकर आणि पंकज भोसले हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. प्रथमेश नर आणि सागर सुर्वे यांचा चांगला खेळ संघाला पराभवापासून रोखू शकला नाही. तत्पूर्वी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आमदार अनिल परब, तृप्ती सावंत, मंडळाचे अध्यक्ष बबन होळकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन केले. पहिल्या दिवसाच्या शेवटच्या लढतीत चेंबूर क्रीडा केंद्र संघाने सांताक्रुजच्या सागर क्रीडा मंडळावर 3 गुणांनी विजय मिळवला. रामचंद्र आलडाल आणि अजय चव्हाण यांच्या चतुरस्त्र खेळामुळे त्यांनी पहिल्या सत्रात 15-10 अशी 5 गुणांची आघाडी घेतली होती. उत्तरार्धात ही आघाडी वाढवत त्यांनी ही लढत 25-22 अशी जिंकली. पराभूत संघातर्फे संतोष पाटील आणि विक्रांत जाधव यांनी चांगला खेळा केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा