या जिद्दीला सलाम!

  Mumbai
  या जिद्दीला सलाम!
  मुंबई  -  

  एखादी गोष्ट करायची ठरवली तर तुम्ही कोणतेही ध्येय साध्य करू शकता. ते साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त परिश्रम आणि ताकदीची गरज असते. याचे जिवंत असे उदाहरण म्हणजे मुंबईतील 55 वर्षीय अनंत पुरव. 2 हार्ट ब्लॉकेजेस म्हणजेच रक्तपुरवठा करणाऱ्या 2 रक्तवाहिन्या बंद असल्याचे कळूनही त्यांनी 87 किलोमीटर कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धा वेळेत पूर्ण केली आहे. अनंत पुरव यांच्याकडे असलेली जिद्द हीच या गोष्टीसाठी कारणीभूत ठरलीय.

  कॉम्रेड्स मॅरेथॉन ही जगातील सर्वात जुनी आणि अवघड मॅरेथॉन स्पर्धा आहे. 1921 या सालापासून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन ते पीटर्स मारीबर्ग दरम्यानच्या डोंगराळ भागात ही स्पर्धा भरवली जाते. पीटर्स मारीबर्ग ते डर्बनमधील रस्ता हा उताराचा असल्याने तो धावपटूंसाठी फार अवघड नसतो. पण, यंदा ही स्पर्धा डर्बन ते पीटर्स मारीबर्ग अशी ठेवण्यात आली होती. त्यामुळे हा चढणीचा रस्ता सर करण्यासाठी धावपटूंना फार मेहनत घ्यावी लागली. कॉम्रेड्स मॅरेथॉन जुनी असून, या स्पर्धेत जवळपास 60 देशांतील स्पर्धक सहभागी होतात. या स्पर्धेत हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात भारतातून 80 जण सहभागी झाले होते. ज्यात अनंत पुरव हे सहभागी होते. अनंत पुरव हे पहिल्यांदाच मॅरेथॉन स्पर्धेत धावत होते.

  11 तास आणि 55 मिनिटांत अनंत पुरव यांनी ही मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली. 2 हार्ट ब्लॉकेजेस असूनही त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना ट्रीटमेंट देणाऱ्या सहाही डॉक्टरांनी ही मॅरेथॉन न खेळण्याचा सल्ला दिला होता. इतकेच नाही, तर त्यांच्या मणक्याचे 2 वर्षांपूर्वी ऑपरेशन देखील झाले होते. अशी परिस्थिती असताना धावायचे कसे? हा प्रश्न त्यांच्यापुढे होताच. पण, कुटुंबीयांचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठिंब्यामुळे त्यांनी या स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवले आणि ही स्पर्धा पूर्ण देखील केली.

  कॉम्रेड्स मॅरेथॉन खेळणे हे माझे स्वप्न होते. पण, ते मी आता पूर्ण केले आहे. गेली 5 वर्ष मी या स्पर्धेसाठी धावत होतो. मेहनत करत होतो. माझे स्वप्न मी पूर्ण केले.

  अनंत पुरव, स्पर्धक

  अनंत पुरव यांनी वयाच्या 50 व्या वर्षी धावायला सुरुवात केली. त्यावेळी आपल्याला कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, असा त्यांचा कोणताही उद्देश नव्हता. पण, काही काळाने त्यांना धावण्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर पुरव यांना वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे वाटू लागले. त्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत मुंबई मॅरेथॉन, हैद्राबाद मॅरेथॉन, दिल्ली मॅरेथॉन, गोवा मॅरेथॉन, सातारा हिल मॅरेथॉन या मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. पण, त्यानंतर पुरव यांचे स्वप्न होते ते कॉम्रेड्स मॅरेथॉन धावून वेळेत पूर्ण करण्याचे. त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली.

  या स्पर्धेपूर्वी पुरव यांनी अनेक वैद्यकीय चाचण्या केल्या होत्या, ज्यात त्यांना 2 हार्ट ब्लॉकेजेस म्हणजे ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या 2 रक्तवाहिन्या 70 ते 75 टक्के बंद झाल्याचे समजले होते. पण, अनंत पुरव यांनी आपल्या इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केली. त्यांची ही इच्छाशक्ती आणि जिद्द खरेच तरुण पिढीलाही लाजवेल अशीच आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.