कबड्डी स्पर्धेत आराध्य, शिवनेरीची उपांत्यपूर्व फेरीत

 Khar
कबड्डी स्पर्धेत आराध्य, शिवनेरीची उपांत्यपूर्व फेरीत
Khar, Mumbai  -  

ओम भारत क्रीडा मंडळाच्यावतीने खार (पूर्व) येथे सुरू असलेल्या भव्य कबड्डी स्पर्धेत महिला गटात आराध्य सेवा संघ, नवशक्ती स्पोर्ट्स क्लब आणि शिवनेरी क्रीडा मंडळ या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. पुरुष गटातील एकमेव लढतीत मुलुंड क्रीडा केंद्र संघाने अभिनव क्रीडा मंडळ संघावर मात केली.

आराध्य सेवा संघाने श्री साई क्रीडा मंडळाविरुद्ध मध्यंतराला 14-7 अशी आघाडी घेताना दोन लोण चढविले होते तर उत्तरार्धात त्यात आणखी दोन लोण चढवत ही लढत त्यांनी 28-16 अशी सहज जिंकली. हरजित सिंधूच्या चढाया आणि साकीर मुल्ला हिच्या सुरेख पकडी यामुळे त्यांना हे साध्य झाले. पराभूत संघाच्या प्रेमल शिंदे आणि रोमित गावडे चांगल्या खेळल्या. दुसऱ्या एका लढतीत बलाढ्य नवशक्ती स्पोर्ट्स क्लब संघाने बेबी जाधव आणि पूजा जाधव यांच्या चतुरस्त्र खेळामुळे सत्यम सेवा संघ कांजूरमार्ग या संघावर 31-18 असा मोठा विजय मिळविला. नवशक्ती संघाने या लढतीत तीन वेळा ‘सुपर कॅच’ गुण वसूल केले. सत्यमची मयुरी सूर्वे आणि प्रियांका ओझरमकर यांचे पराभव टाळण्याचे प्रयत्न अपुरे ठरले. आणखी एका एकतर्फी लढतीत शिवनेरी क्रीडा मंडळाने रुपाली महाडिक आणि चारुलता देशमुख यांच्या दमदार खेळामुळे नवख्या भवन्स मंडळ संघावर 25-7 असा लीलया विजय मिळविला.

पुरुष गटाच्या एकमेव लढतीत मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड या संघाने पुनीत पुजारी याच्या दमदार चढाया आणि योगेश गुरव याच्या पकडींच्या बळावर अभिनव क्रीडा मंडळ गोरेगाव या संघाला 35-18 असे हरविले. अभिनवच्या दीपेश चांदिवडेकर आणि सोहम मोरे यांची झुंज अपयशी ठरली. मॅटवर आणि प्रो कबड्डी लीगच्या नियमांप्रमाणे खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Loading Comments