अादित्य मेहता अाणि पंकज अडवाणी ही भारतीय स्नूकरमधील दोन दिग्गज नावं. मात्र हे दोघेही घरच्या मैदानात एकमेकांसमोर उभे राहिले तर चाहत्यांना या महान खेळाडूंचा खेळ याचि देही याचि डोळा पाहण्याची अनोखी संधी मिळेल. १ फेब्रुवारीपासून सीसीअायच्या विल्सन जोन्स बिलियर्डस रूममध्ये रंगणाऱ्या सीसीअाय अोपन स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत अादित्य अाणि पंकज अडवाणी विजेतेपदासाठी झुंजणार अाहेत. देशातील अव्वल स्नूकरपटू सहभागी होणार असल्यामुळे या स्पर्धेला 'क्लॅश अाॅफ टायटन्स' असे संबोधले जात अाहे.
भारतातील अव्वल अाठ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार अाहेत. नुकताच राष्ट्रीय विजेता ठरलेला चंडीगढचा सुमित तलवार, उपविजेता मलकीत सिंग तसंच दोन वेळा अाशियाई स्नूकर चॅम्पियन ठरलेला यासिन मर्चंट, माजी राष्ट्रीय विजेता सोनिक मुलतानी, मुंबईस्थित अादित्य मेहता, पंकज अडवाणी यांसारखे स्नूकरपटू या स्पर्धेत एकमेकांशी झुंजतील.
या स्पर्धेतील विजेत्याला दोन लाखांचे तर उपविजेत्याला १.३० लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार अाहे. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्यांना प्रत्येकी ७५ हजार रुपये देण्यात येतील. उपांत्यपूर्व फेरीत मजल मारणाऱ्यांना ४० हजार रुपयांचा लाभ होईल. स्पर्धेदरम्यान १४७ गुणांचा ब्रेक लगावणाऱ्यांसाठी १.४७ लाख रुपयांची विशेष बक्षिसे देण्यात येतील. त्याचबरोबर सर्वाधिक गुणांचा ब्रेक लगावणाऱ्याला २५ हजार रुपयांचे इनाम देण्यात येईल.