महापौर बुद्धिबळ स्पर्धेत दिप्तयान, दीपन आघाडीवर

  Bandra
  महापौर बुद्धिबळ स्पर्धेत दिप्तयान, दीपन आघाडीवर
  मुंबई  -  

  दहाव्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत भारताचा ग्रँड मास्टर व द्वितीय मानांकित दिप्तयान घोषने उत्तरांचलच्या सक्षम रौतेलाचा 50 चालींत पराभव करत तीन गुणांसह संयुक्त आघाडी राखली. वांद्रे येथील माऊंट लिटेरा स्कूल इंटरनॅशनलच्या सभागृहात ही स्पर्धा झाली.

  या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी मास्टर मृदूल देहाणकरने बांगलादेशचा ग्रँडमास्टर व सातवा मानांकित मोल्ला अब्दुल्ला अल रकीबला बरोबरीत रोखून त्याची आघाडी रोखली. तामिळनाडूचा ग्रँड मास्टर दीपन चक्रवर्तीने आंध्रप्रदेशची महिला फिडे मास्टर जीशिथा डी. चा पराभव करून तिसरा गुण वसूल केला.

  ग्रँड मास्टर दिप्तयान घोषविरुद्ध खेळताना सक्षम रौतेलाने राजाच्या पुढील प्याद्याने डावाची सुरुवात केली. दिप्तयानने रॉय लोपेझ पद्धतीमध्ये सामना रुपांतरीत केला. 15 व्या चालीत दिप्तयानने प्याद्यांच्या सहाय्याने सक्षमच्या राजावर जोरदार हल्ले केले आणि 50 व्या चालीला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.


  हेही वाचा

  जलद बुद्धिबळ स्पर्धेत अलैना, वेदांतची विजयी सलामी


  दुसरीकडे ग्रँड मास्टर मोल्ला अब्दुल्ला अल रकीबने वजीरासमोरील प्याद्याने डावाची सुरुवात केली. त्याला मृदुलाने घोड्याची चाल रचून प्रत्युत्तर दिले. 40 चालींनंतर सगळ्या सोंगट्या अडकून राहिल्यामुळे दोघांनीही बरोबरी पत्करली. परिणामी रकीबचे संयुक्त आघाडीतील अग्रस्थान हुकले.

  तिसऱ्या फेरीअखेर पश्चिम बंगालचा दिप्तयान घोष, तामिळनाडूचा ग्रँड मास्टर दीपन चक्रवर्ती, पश्चिम बंगालचा ग्रँड मास्टर निलोत्पल दास, तजिकिस्तानचा इंटरनॅशनल मास्टर मोहम्मद, बांगलादेशचा ग्रँड मास्टर मुर्शेद नियाझ, कर्नाटकचा इंटरनॅशनल मास्टर रघुनंदन श्रीहरी, पश्चिम बंगालचा सायंतन दास, तामिळनाडूचा इंटरनॅशनल मास्टर इनियन पी., पश्चिम बंगालची श्रुतार्शी राय, पाँडीचेरीचा बद्रीनाथ एस., तामिळनाडूचा सरावना कृष्णन आदी बुद्धिबळपटू तीन गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.