SHARE

कोल्हापूरच्या बिगरमानांकित समीद जयकुमार सेठे याने अापला सुरेख फाॅर्म कायम राखत भारताचा ग्रँडमास्टर संदीपन चंदा याला सातव्या फेरीत पराभवाचा धक्का दिला अाहे. वांद्रे येथील माउंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू असलेल्या ११व्या मुंबई महापौर चषक अांतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीअखेर अनेक बुद्धिबळपटू अाघाडीवर असल्यामुळे जेतेपदाची चुरस वाढत चालली अाहे.


किंग पाॅन अोपनिंगने सुरू झालेल्या या डावात संदीपनने (एलो २५७१) किंगसाइड फियानचेट्टो डावाने सुरुवात करत समीदला प्रत्युत्तर दिले. ३२व्या चालीला समीदने एक प्यादे मारले अाणि ४१व्या चालीला प्रतिस्पर्ध्याचा उंट अाणि हत्ती मिळवला. संदीपनला समीदच्या कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागल्यानंतर त्याला पराभव पत्करावा लागला.


क्रावस्तिवची राहुलवर मात

अव्वल मानांकित ग्रँडमास्टर क्रावस्तिव मार्टिन (एलो २६६२) याने भारताच्या राहुल व्ही. एस. (एलो २२३३) याच्यावर मात करत जोमाने पुनरागमन केले. राहुलने किंग्स इंडियन बचाव पद्धतीने डावाची सुरुवात केल्यानंतर मार्टिनने हत्तीच्या साहाय्याने अाक्रमण केले. राहुलने त्याचा हा डाव परतवून लावला. मार्टिनने अापल्या हत्तीचा बळी दिल्यानंतर अाक्रमक खेळ केला अखेर राहुलला ३०व्या चालीनंतर पराभव स्वीकारावा लागला.


ब गटात पवन बीएनबी विजेता

ब गटातील अंतिम फेरीत, अांध्र प्रदेशच्या पवन बीएनबी याने ८.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. पवनसह पुद्दुचेरीचा श्रीहरी एल. अाणि महाराष्ट्राचा नमित चव्हाण यांचे सारखे गुण झाले होते. अखेर मानांकनाच्या अाधारावर पवनने बाजी मारली. श्रीहरीला दुसऱ्या तर नमितला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.


हेही वाचा -

मुंबई महापौर बुद्धिबळ : दोन भारतीय बुद्धिबळपटू सहाव्या फेरीअखेर अाघाडीवर

मुंबई महापौर बुद्धिबळ : राजा रुत्विकचा युक्रेनचा ग्रँडमास्टरला धक्का

संबंधित विषय
ताज्या बातम्या