Advertisement

राष्ट्रकुलमध्ये कोल्हापूरचा दबदबा, राहुल अावारेला सुवर्ण तर तेजस्विनी सावंतला रौप्य


राष्ट्रकुलमध्ये कोल्हापूरचा दबदबा, राहुल अावारेला सुवर्ण तर तेजस्विनी सावंतला रौप्य
SHARES

राष्ट्रकुल स्पर्धेत अाज कोल्हापूरच्या खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. कुस्तीत राहुल अावारेनं सुवर्ण तर नेमबाज तेजस्विनी सावंत हिनं रौप्यपदक पटकावत महाराष्ट्राची मान उंचावली. राहुल अावारेचं राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचं स्वप्न अखेर अाज साकार झालं. कोल्हापूरचा मल्ल अाणि प्रशिक्षक काका पवार यांचा शिष्य राहुलनं ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशी याला धूळ चारत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. राहुलची अाॅलिम्पिकवारी हुकली असली तरी प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्याचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं.



राहुलचा दबदबा

पहिल्या दोन बाऊटमध्ये तांत्रिकदृष्ट्या वरचढ ठरल्यात राहुलनं अापला दबदबा निर्माण केला. त्यानं या दोन बाऊटमध्ये इंग्लंडच्या जाॅर्ज राम अाणि अाॅस्ट्रेलियाच्या थाॅमस सिसहिनी यांना पराभूत केले. उपांत्य फेरीत त्याने पाकिस्तानच्या मुहम्मद बिलाल याला १२-८ असे अस्मान दाखवले. अंतिम फेरीत ताकाहाशीने तीन गुण मिळवत अावारेला अडचणीत अाणलं. पण राहुलने चपळाई, अाक्रमकता यांचा मिलाफ साधत १५-७ अशा फरकानं बाजी मारली.



तेजस्विनी सावंतला नेमबाजीत रौप्य

कोल्हापूरची नेमबाज तेजस्विनी सावंत हिनं महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदक पटकावण्याची करामत केली. तीन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या तेजस्विनीचं हे सहावं राष्ट्रकुल पदक ठरलं. गुरुवारी ६१८.९ गुणांची कमाई करत तेजस्विनीनं रौप्यपदक मिळवलं.


हेही वाचा -

राष्ट्रकुलमध्ये ठाण्याच्या मधुरिका पाटकरला टेबल टेनिसमध्ये सांघिक सुवर्णपदक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा