अग्निशमन दलाच्या कसरतींचा थरार

भायखळा - भायखळ्याच्या मुंबई अग्निशमन दल मुख्यालयात अग्निशमन फायर ड्रिल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत एखादी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास कशापद्धतीने ती नियंत्रणात आणायची याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं.

या स्पर्धेत मुंबईतील एकूण 30 अग्निशमन केंद्रांनी सहभाग घेतला होता. फायर ट्रेलर पंप ड्रिल , अँगल्स लॅडर मोटर पंप फायर ड्रिल, अँगल्स लॅडर फायरमन लिफ्ट रेस्क्यू फायर ड्रिल अशा तीन विभागात ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत अग्निशमन दलाच्या जवानांनी आपलं कर्तृत्व दाखवत अनेक साहसी प्रात्यक्षिकं सादर केली.

अग्निशमन दलाकडून आयोजित केलेल्या या स्पर्धेला मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपस्थिती लावली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अग्निशमन दल ठरलेल्या कुर्ला अग्निशमन दलाला उपायुक्त पल्लवी दराडे यांनी मानचिन्ह देऊन सन्मानित केले. या निमित्ताने अग्निशमन दलाच्या आधुनिकतेचं दर्शन मुंबईकरांना झालं.

Loading Comments