Advertisement

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
SHARES

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं बुधवारी निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. भारताला बॅडमिंटनमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवून देणारे आणि पहिले अर्जून पुरस्कार विजेते म्हणून त्यांची ओळख आहे. नाटेकर यांना १९६१ साली अर्जून पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक नंदू नाटेकर यांनी उंचावला. त्यांच्या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्राला झळाळी मिळाली. तरूणांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा मिळाली. होतकरू खेळाडूंसाठी ते आदर्श ठरले. त्यांच्या निधनामुळे क्रीडाक्षेत्रातील मार्गदर्शक असं व्यक्तिमत्त्व हरपले आहे. नाटेकर यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान महाराष्ट्राच्या चिरंतन स्मरणात राहील. महाराष्ट्र सुपुत्र, महान खेळाडू नंदू नाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

तर, ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनला देशात लोकप्रियता मिळवून दिली. भारतीय बॅडमिंटनची आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण केली. भारतीय खेळाडू आज आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवित असलेले यश नंदू नाटेकर यांनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर उभे आहे. नंदू नाटेकर यांचे निधन ही बॅडमिंटन क्षेत्राची, राज्याच्या क्रीडाविश्वाची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे स्मरण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनमध्ये  मिळवलेले यश हे औपचारिक प्रशिक्षणाशिवाय स्वकष्टावर  मिळवलेलं यश होतं. असे असले तरी ते अनेक उदयोन्मुख खेळाडूंसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत होते. अर्जुन पुरस्काराने त्यांचा झालेला गौरव हा भारतीय बॅडमिंटनक्षेत्राचा गौरव होता. भारतीय बॅडमिंटनचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या या महान खेळाडूला भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा