Advertisement

महाराष्ट्र श्री किताब विजेत्याला मिळणार राॅयल एनफिल्ड


महाराष्ट्र श्री किताब विजेत्याला मिळणार राॅयल एनफिल्ड
SHARES

महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवातील मानाचे पान असलेली महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा यंदा वांद्रे वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीतील पीडब्ल्यूडी मैदानात रंगणार अाहे. २४ अाणि २५ फेब्रुवारीला होणाऱ्या या राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेच्या भव्यदिव्य अायोजनाचं शिवधनुष्य अभिवन फाऊंडेशनच्या महेश पारकर यांनी पेललं अाहे. मुख्य म्हणजे, या स्पर्धेतील किताब विजेत्याला दीड लाख रुपयाच्या पुरस्कारासह राॅयल एनफिल्ड ही बाइक देऊन गौरविण्यात येणार अाहे. त्यामुळे यंदाच्या १४व्या महाराष्ट्र श्री स्पर्धेचे विजेतपद मिळवण्यासाठी दिग्गजांमध्ये चुरस रंगणार अाहे. या स्पर्धेसह तिसरी फिजिक स्पोर्टस अजिंक्यपद स्पर्धाही होणार अाहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी २४ फेब्रुवारीला वांद्रे पूर्वेकडील उत्तर भारतीय संघच्या सभागृहात पार पडेल.


पुरस्कारांमध्ये वाढ

पुरस्कार रकमेत भरघोस वाढ करण्याचा निर्णय अायोजकांनी घेतला असून विजेत्याला रोख पुरस्कार आणि अप्रतिम चषकासह बुलेट दिली जाईल. एकंदर दहा गटात होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक गटातील अव्वल पाच खेळाडूंना अनुक्रमे १५, १२, १०, ८ अाणि ५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेचा उपविजेता ५० हजारांचा तर द्वितीय उपविजेता २५ हजारांचा मानकरी ठरेल. त्याचबरोबर फिजीक स्पोर्टस प्रकारात पुरूष व महिलांच्या गटातही अव्वल खेळाडूंना पुरस्कार दिले जातील.


महाराष्ट्र श्रीसाठी 'काँटे की टक्कर'

मुंबईकर सुनित जाधव सलग पाचव्यांदा महाराष्ट्र श्री बहुमान पटकावण्यासाठी सज्ज झाला अाहे. सुनितनं यंदाही प्रचंड मेहनत घेतली अाहे. त्याच्यासमोर कडवे आव्हान असेल ते मि. वर्ल्ड स्पर्धेत सोनेरी कामगिरी करणाऱ्या महेंद्र चव्हाणचे. तसंच मुंबई श्री विजेता अतुल आंब्रे, भारत श्री अक्षय मोगरकर आणि सागर कातुर्डे यांनीही महाराष्ट्र श्री स्पर्धेत जेतेपदाचे ध्येय समोर ठेवल्यामुळे यंदा मुंबईकरांना काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.


महिला शरीरसौष्ठवपटूंसाठी 'मिस महाराष्ट्र'

महिला शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी मिस महाराष्ट्र स्पर्धेचेही आयोजन करण्यात अाले अाहे. फिजीक स्पोर्टस प्रकारात ही स्पर्धा होणार असून यात महिलांबरोबर पुरूषांच्याही गटाचा समावेश आहे. या गटातून आगामी मि.इंडियासाठी महाराष्ट्राचे संघ निवडले जाणार असल्यामुळे या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने खेळाडू तयारी करीत असल्याची माहिती महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस ऍड. विक्रम रोठे यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा