Advertisement

महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघाची आगेकूच


महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघाची आगेकूच
SHARES

महाराष्ट्राच्या मुलींनी इ गटात गोव्याचा 47-07 असा धुव्वा उडवत 28व्या किशोर/किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. ऋतुजा लांडे, राधा मोरे यांच्या धारदार चढाया आणि त्याला कर्णधार पायल वसवे हिची मिळालेली पकडीची भक्कम साथ, यामुळे महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपले वर्चस्व कायम राखले.

पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्याने दुसऱ्या दिवशी चिन्नावेदपट्टम, कोईम्बतूर, केरळ येथील डी. एफ. एस. कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सच्या क्रीडांगणावर झालेल्या पहिल्या सामन्यात मात्र मुलींना साई सेंटरकडून 19-47 असा पराभव पत्करावा लागला होता. नंतर त्यांनी या पराभवाच्या कटू आठवणी पुसून टाकत गोव्यावर विजय प्राप्त केला. महाराष्ट्राचा हा झपाटा पहाता शेवटच्या सामन्यात झारखंडने देखील न खेळता आपला पराभव मान्य करत मुलींना सामना बहाल केला. यामुळे महाराष्ट्राने या गटातून उपविजयी म्हणून बाद फेरी गाठली.

महाराष्ट्राच्या मुलांनी ड गटातून आगेकूच करताना पहिल्या सामन्यात आंध्र प्रदेशचा 44-27 असा तर प. बंगालचा 55-22 असा पराभव केला. या दोन्ही सामन्यात सूरज पाटील, अमोल राठोड यांच्या चढाया त्याला अतुल पाटील यांनी दिलेली पकडीची भक्कम साथ महत्त्वाची ठरली. कर्नाटकने मात्र महाराष्ट्रावर 42-37 अशी मात करत त्यांचा विजयी रथ रोखला. मध्यंतराला 19-17 अशी आघाडी घेणाऱ्या कर्नाटकने ती शेवटपर्यंत आपल्या हातून निसटू दिली नाही. सूरज पाटील, महेश भोईर यांचा खेळ संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडला. या स्पर्धेत महाराष्ट्राला बाद फेरीत प्रवेश करायचा असेल तर शेवटच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. याबद्दल संघ व्यवस्थापक दत्ताराम पारकर यांच्याशी संवाद साधला असता "पँडिचेरीचा पराभव करून बाद फेरी निश्चित गाठू" अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा