पॉवर बोटिंग स्पर्धेत कुलाबा कोळीवाडा अव्वल

  मुंबई  -  

  नरिमन पॉईंट - वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा,  हे गीत गात मुंबईच्या भूमिपूत्रांनी आपापल्या होड्या घेऊन बोटिंग स्पर्धेचा शुभारंभ केला. नरिमन ते गिरगाव चौपटी येथे रविवारी पहिल्यांदाच कोळी बांधवांच्या स्पर्धेचा थरार मुंबईकरांनी अनुभवला. या स्पर्धेत पहिला क्रमांक कुलाबा कोळीवाड्याने मिळवला तर दुसरा वर्सोवा आणि तिसरा क्रमांक हा हाजीअली कोळीवाडा यांनी पटकावला. यामध्ये पहिल्या क्रमांकास एक लाख, दुसऱ्या क्रमांकास साठ हजार तर तिसऱ्यास चाळीस हजार असे पारितोषिक देण्यात आले. या वेळी कोळी बांधव पारंपारिक वेशभुषेत एखादा उत्सव असावा असे नटून-थटून आले होते.

  कोळी बांधवांच्या स्पर्धेसोबतच नेक्सा पी-वन पॉवरबोट स्पर्धाही चांगलीच रंगली. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धकांनीही सहभाग घेतला होता. बलेनो बुस्टर जेट्स या संघाने या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. या संघाला पन्नास हजार डॉलर पारितोषिक मिळाले. तर विराट ट्रॉफीही या संघाने पटकावली. विराट ट्रॉफी निवृत्त आयएनएस विराट जहाजाच्या भागांपासून बनवण्यात आली आहे. विशेष म्हणजे बलेनो बुस्टर जेट्स या संघात सी. एस. संतोषने देखील भारताचे प्रतिनिधीत्व केले. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस त्यात हा रेसिंगचा थरार. मग मुंबईकर तरी कसले ऐकतायेत. मुंबईत पहिल्यांदाच आयोजित रेंसिंगचा प्रेक्षकांनीही मनमुराद आनंद लुटला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.