Advertisement

नुबेरशाह शेखने जिंकली सतीश सबनीस जलद बुद्धिबळ स्पर्धा


नुबेरशाह शेखने जिंकली सतीश सबनीस जलद बुद्धिबळ स्पर्धा
SHARES

शिवाजी पार्कच्या मैदानावर विजेतेपदाची उत्कंठता शिगेला पोहोचली होती... विजेतेपदासाठी नुबेरशाह शेख, राकेश कुलकर्णी, अोम खरोला अाणि वेदांत पानेसर यांच्यात कडवी चुरस रंगणार होती... अखेर नुबेरशाहने अोम खरोलाविरुद्ध बरोबरी पत्करली अाणि राकेश कुलकर्णीने वेदांत पानेसरला बरोबरीत रोखले. मात्र नवव्या फेरीअाधी घेतलेल्या अर्ध्या गुणाच्या अाघाडीमुळे नुबेरशाह शेखने अाठ गुणांसह सतीश सबनीस जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. ग्रँडमास्टर नाॅर्म पटकावणाऱ्या नुबेरशाहला २१ हजार रुपये रोख अाणि अाकर्षक चषक देऊन गौरवण्यात अाले. 

सरस गुणांच्या अाधारे राकेश कुलकर्णीने ७.५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली, त्याला १५ हजार रुपयांवर समाधान मानावे लागले. अोम खरोलाने ७.५ गुणांसह तिसरा तर साईराज चित्तलने चौथा क्रमांक प्राप्त केला. त्यांना अनुक्रमे ११ हजार अाणि ९ हजार रुपये रोख अाणि अाकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात अाले. भारताचा हाॅकीपटू युवराज वाल्मिकी, भारताचे माजी क्रिकेटपटू अाणि शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण अमरे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात अाले.



स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद

मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन अाणि सतीश सबनीस फाऊंडेशन अाणि मुंबई लाइव्ह  माध्यमाने अायोजित करण्यात अालेल्या या जलद बुद्धिबळ स्पर्धेला स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. परीक्षांचा मोसम सुरू असतानाही तब्बल २९० बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. इतकंच नव्हे तर अनेक स्पर्धकांनी थेट शिवाजी पार्क जिमखान्यावर येऊन या स्पर्धेत भाग घेतला. चार वर्षांच्या मुला-मुलींपासून ते ७० वर्षांच्या अाजोबांपर्यंत सर्वांनी या स्पर्धेत अापल्या कौशल्याची चुणूक दाखवली.


क्रिकेटच्या पंढरीत बुद्धिबळाची क्रेझ

शिवाजी पार्क जिमखाना ही क्रिकेटची पंढरी. पण या पंढरीत रविवारी ११ मार्च रोजी बुद्धिबळाची क्रेझ पाहायला मिळाली. सकाळी ८ वाजल्यापासूनच बुद्धिबळपटूंचा ताफा शिवाजी पार्ककडे येण्यास सुरुवात झाली. झोन-५चे पोलीस उपायुक्त राजीव जैन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे तसंच ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात अालं. 

जवळपास २९० बुद्धिबळपटूंमध्ये जेतेपदासाठी रंगलेली स्पर्धा, नीटनेटके अायोजन, पालकांच्या बसण्याची उत्तम सोय याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवत होतं. विशेष म्हणजे, खुल्या गटात खेळविण्यात अालेल्या या जलद बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल ठरणाऱ्या ३० जणांवर रोख पारितोषिकांचा वर्षाव केला जाणार असल्यामुळे रोख बक्षिस मिळविण्यासाठी चढाअोढ रंगली होती. पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी युवराज वाल्मिकीने अापला प्रेरणादायी संघर्ष सर्वांसमोर कथन केला. तो एेकून अनेकांना चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली. या स्पर्धेला सुरुवातीपासूनच हंसराज दामोदर ट्रस्टचं विशेष सहकार्य लाभलं अाहे. 



अंध बुद्धिबळपटू ठरले अाकर्षण

सशक्तांच्या स्पर्धांमध्ये दिव्यांग खेळाडूंना संधी, ही अभावानेच पाहायला मिळते. पण सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धेत अंध बुद्धिबळपटूंसाठी वेगळी स्पर्धा घेण्यात अाली. या स्पर्धेलाही अंध बुद्धिबळपटूंनी तुफान प्रतिसाद दिला. दृष्टी नसतानाही बुद्धिबळाच्या पटावर मात्र चाली कशा खेळल्या जातात, याची झलकच त्यांनी दाखवून दिली. या गटात सतीश वाहुले याने ५ गुणांसह जेतेपद पटकावले तर सागल मांगुर्डे याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा