Advertisement

ओम कबड्डी संघ ठरला 'बजरंग सुवर्ण चषक' चा मानकरी


ओम कबड्डी संघ ठरला 'बजरंग सुवर्ण चषक' चा मानकरी
SHARES

बजरंग क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या बजरंग सुवर्ण चषक कबड्डी स्पर्धेत ओम कबड्डी संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवून बजरंग सुवर्ण चषकावर आपले नाव कोरून चषक आणि एक लाख रोख मिळवण्याचा मान पटकावला. महाराष्ट्र आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने लोअर परेल येथील ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखान्यात हे सामने पार पडले.

ओम कबड्डी संघाने शिवशंकरचा अत्यंत चुरशीच्या लढतीत 28- 25 असा पराभव करीत जेतेपदाला गवसणी घातली. तर उपविजेत्या शिवशंकरला बजरंग चषक आणि रोख 51 हजारांवर समाधान मानावे लागले. तर ओम कबड्डी संघाचा प्रशांत जाधव स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला "होंडा शाईन" मोटारबाईक देऊन गौरविण्यात आले.

पूर्वार्धात भक्कम बचाव करीत शिवशंकरने ओमवर लोण देत आघाडी घेतली. विश्रांतीला त्यांच्याकडे 15-11 अशी आघाडी होती. उत्तरार्धात ओमच्या प्रशांत जाधवने आक्रमकतेला कल्पकतेची जोड देत एक- एक गडी टिपत शिवशंकरवर लोण देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने 5 गडी टिपले. यामुळे त्यांच्याकडे आघाडी आली. शेवटची 6 मिनिटे पुकारली तेव्हा 24-18 अशी ओमकडे आघाडी होती. शिवशंकरच्या निलेश साळुंखेने सामन्याची शेवटची चढाई टाकली तेव्हा 26-25 अशी ओम संघाकडे 1 गुणाची आघाडी होती आणि त्यांचे अवघे दोन खेळाडू मैदानात शिल्लक होते. पण या चढाईत प्रशांत चव्हाण आणि गिरीश इरनाकने निलेशची अव्वल पकड करत संघाला 3 गुणांनी जेतेपद प्राप्त करून दिले. 

या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला तो प्रशांत आणि पंकज या चव्हाण बंधूंनी. प्रशांतने 4 यशस्वी पकडी केल्या आणि मोक्याच्या क्षणी चढाईत निलेशला टिपले. यातील निलेशची शेवटची अव्वल पकड होती. पंकजने 8 यशस्वी पकडी केल्या. पकडीच्या 14 गुणांपैकी 13 गुण या दोघांचे आहेत. प्रशांत जाधवने चढाईत 2 बोनस व 6 झटापटीचे असे 8 गुण घेत त्यांना छान साथ दिली. शिवशंकरच्या निलेश साळुंखेचा या सामन्यात प्रभाव पडला नाही. त्याने 15 चढाया करीत 1 बोनस व 5 गुण असे 6 गुण मिळविले. पण तीनवेळा त्याची पकड झाली. शिवशंकरने बचावामध्ये 10 यशस्वी पकडी करीत 11 गुण मिळविले. यातील एक अव्वल पकड होती.

स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा खेळाडू ठरला तो सांगलीच्या सम्राटचा अभिषेक पाटील, तर उत्कृष्ट पकडीचा खेळाडू ठरला तो शिवशंकरचा तुषार भोईर. दोघांनाही प्रत्येकी रोख रु. 25 हजार देऊन सन्मानित करण्यात आले. या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात ओम कबड्डी संघाने पुण्याच्या सतेजला 30-20 असे तर शिवशंकरने सांगलीच्या सम्राटाला 22-20 असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. दोन्ही उपांत्य उपविजयी संघांना प्रत्येकी रोख 10 हजार आणि बजरंग चषक प्रदान करण्यात आला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण विभागीय आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राष्ट्रीय कॅरम खेळाडू महेंद्र तांबे, मंडळाचे कार्याध्यक्ष अरविंद शिंदे, अध्यक्ष सुरेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा