Advertisement

कबड्डी... कबड्डी... कबड्डी...


कबड्डी... कबड्डी... कबड्डी...
SHARES

करी रोड येथील ना.म.जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना मैदानावर झालेल्या व्यवसायिक महिलांच्या सामन्यात देना बँकेने मुंबई महानगर पालिकेला 29-15 असे पराभूत करत विजयी सलामी दिली. मध्यांतरापर्यंत 16-08 अशी आघाडी घेणाऱ्या देना बँकेने नंतरही त्याच जोशाने खेळ करीत सामना सहज आपल्या नावे केला. स्नेहा बिबवे, तेजश्री चौगुले, मंगला माने, सुधा पोवार देना बँकेच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मुंबई पालिकेच्या मनीषा चौगुले, स्वाती मोकल यांचा खेळ संघाचा पराभव टाळण्यासाठी कमी पडला.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणाने इम्राल इन्फास्ट्रक्चरचा 34-16 असा धुव्वा उडवला. विश्रांतीला त्यांच्याकडे 16-8 अशी आघाडी होती. कोमल देवकर, राजश्री पवार, तेजस्वीनी पोटे या विजयात चमकल्या. इम्राल संघाच्या सायली फाटक, माधुरी गवंडी यांनी बरी लढत दिली. महाराष्ट्र पोलीस संघाने साई सिक्युरिटीचा 39-21 असा पराभव केला. पूर्वार्धात धुव्वादार खेळ करीत 26-09 अशी मोठी आघाडी घेणाऱ्या पोलिसांनी उत्तरार्धात सावध खेळ खेळला. श्वेता राणे, दर्शना वानखेडे, भार्गवी माने यांच्या आक्रमक खेळामुळे पोलीस हा मोठा विजय मिळवू शकले.

व्यवसायिक पुरुषांच्या ब गटात महिंद्राने दोन विजय प्राप्त करीत आरामात बाद फेरी गाठली. प्रथम त्यांनी ठाणे पोलिसांचा 20-15 असा, तर नंतर झालेल्या सामन्यात मुंबई बंदराचा 11-08 असा पराभव करत आगेकूच केली. सुमित पाटील, सिकंदर केळकर, स्वप्निल शिंदे, अभिषेक भुजंग, सुहास बागवे महिंद्राच्या या विजयात चमकले. अ गटात युनियन बँकेने रिझर्व्ह बँकेवर 43-18 अशी मात केली. जोरदार आक्रमणावर भर देत विश्रांतीला 23-07 अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या युनियन बँकेने उत्तरार्धात देखील तोच वेग कायम राखत सामना आपल्या खिशात टाकला. अजिंक्य कापरे, योगेश सुर्वे, विजय दिवेकर, सिद्धेश तटकरे यांच्या जोशपूर्ण खेळामुळे त्यांनी हा विजय साकारला. ओमकार शिर्के, अनिकेत पेवेकर यांनी रिझर्व्ह बॅँकेकडून दिलेली लढत कौतुकास्पद होती. देना बँकेने फ गटात मुंबई महानगर पालिकेवर 26-15 असा विजय मिळवला. पूर्वार्धापर्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात देना बँककडे 8-7 अशी अवघ्या एका गुणाची आघाडी होती. उत्तरार्धात मात्र बँकेने आपला गियर बदलला. सुदेश कुळे, आकाश गोजारे, परेश म्हात्रे यांनी जोरदार प्रतिकार करीत आणि भक्कम बचाव करीत संघाला 11 गुणांनी विजय मिळवून दिला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा