राज्य ग्रीकोरोमन कुस्तीत, पुण्याला सर्वसाधारण विजेतेपद

  wadala
  राज्य ग्रीकोरोमन कुस्तीत, पुण्याला सर्वसाधारण विजेतेपद
  मुंबई  -  

  वडाळा - एकविसाव्या राज्य अजिंक्यपद ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्याने सर्वसाधारण अंतिम विजेतेपद आणि कोल्हापूर जिल्ह्याने अंतिम उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई शहर तालीम संघाचे कार्याध्यक्ष संजय शेटे आणि माजी ऑलिम्पियन कुस्तीगीर मारुती आडकर यांच्या हस्ते पार पडला.

  आठ वजनी गटामधील विजेतेपद पटकावण्यासाठी चुरशीच्या अंतिम लढती वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंदिरात झाल्या. मुंबई शहर तालीम संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या उपस्थितीत ही अंतिम फेरी पार पडली. यामध्ये 59 किलो वजनी गटातल्या लढतीमध्ये कोल्हापूरच्या अभिजित पाटीलने मुंबई उपनगरच्या गोविंद यादवचा 8-0 ने पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. तर 66 किलो वजनी गटामध्ये कोल्हापूरच्या विक्रम कुऱ्हाडेने पुण्याच्या अरुण खेगलेचा सालतूक डाव साधत चीतपट केले. तर 71 किलो वजनी गटामध्ये प्रीतम खोतने बॅक थ्रो डावावर मुंबई उपनगरच्या गोकुल यादवचे आव्हान संपुष्टात आणले. 75 किलो वजनी गटामध्ये सोलापूरच्या अण्णासाहेब जगतापने चीतपट करून पुण्याच्या अक्षय मोडकवर मात केली.

  80 किलो वजनी गटामध्ये पुण्याच्या अनिकेत खोपडेने पुणे शहराच्या शुभम गव्हाणेचा तांत्रिक गुणावर 8-0 असा अंतिम पराभव केला. 85 किलो वजनी गटामध्ये पिंपरी-चिंचवडच्या किशोर नखातेने पुण्याच्या विशाल भोईरचा पराभव करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. 98 किलो वजनी गटाचा प्रथम क्रमांक पटकावताना लातूरच्या शैलेश शेळकेने जळगावच्या अतुल पाटीलला चीतपट केले. तर 130 किलो वजनी गटामध्ये बीडच्या अक्षय शिंदेने सांगलीच्या शंकर मोहितेचा 8-0 अशा तांत्रिक गुणांवर पराभूत करून सुवर्णपदकाला गवसणी घातली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.