Advertisement

मुंबई मॅरेथाॅनद्वारे शिबानी गुलाटीचा अवयवदानाचा संकल्प


मुंबई मॅरेथाॅनद्वारे शिबानी गुलाटीचा अवयवदानाचा संकल्प
SHARES

मुंबईकरांना फिटनेसचा ध्यास घेण्यासाठी प्रेरित करणारी टाटा मुंबई मॅरेथाॅन शर्यत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली अाहे. या मॅरेथाॅनमध्ये प्रत्येक जण पदक मिळवण्यासाठीच सहभागी होत नसतो. काही जण सामाजिक संदेश देण्यासाठीही या शर्यतीत धावत असतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी अाहे शिबानी गुलाटी यांची. सात वर्षांपूर्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लान्ट) झाल्यानंतर जणू तिचं अायुष्यच संपल्यागत झालं होतं. तिच्या जगण्याला कोणतीही दिशा उरली नव्हती. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अापण काहीही साध्य करू शकतो, हे जगाला दाखवून देण्याचा ध्यास तिने घेतला अाणि अवयवदानाचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्याचा वसा तिने उचलला.



३ किमी.चे अंतर पार करताना झाली दमछाक


२०१२ पासून तिने अवयवदानाचा वसा हाती घेतला असून ती मुंबई मॅरेथाॅनमध्ये धावत अाहे. सुरुवातीला ३ किमीच्या शर्यतीत धावण्याचा निर्णय तिने घेतला. पण कोणत्याही प्रशिक्षणाविना हे अंतर पार करताना तिची पुरती दमछाक झाली होती. तो प्रसंग अाजही शिबानी विसरलेली नाही. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर कोणाच्याही मदतीविना तिने ही शर्यत पूर्ण केली होती. किडनी ट्रान्सप्लान्टनंतरही नियमित जीवन जगता येतं, हेच यातून शिबानीने दाखवून दिलं होतं.


अाता २१ किमी. धावणार

नाऊमेद न होता, रडत न बसता नव्याने अायुष्य जगून जगण्याची नवी उमेद जागवता येते, हे शिबानीनं दाखवून दिलं अाहे. शिबानी गुलाटी यंदा २१ किमी.च्या अर्धमॅरेथाॅन शर्यतीत धावणार अाहे. यासाठी तिने या वर्षीपासून योगा अभ्यासाला महत्त्व दिले अाहे. अवयवदानाचे महत्त्व लोकांना समजावे, अवयवदानाबद्दल अधिकाधिक जण सक्रिय व्हावेत अाणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचावा, यासाठी शिबानी दरवर्षी मुंबई मॅरेथाॅनमध्ये धावत अाहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा