SHARE

गेल्या काही शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भारत श्री ठरलेल्या सुनीत जाधवने विजेतेपदांचा धडाकाच लावला होता. सुनीतच्या महाकाय शरीरयष्टीपुढे महाराष्ट्राचे अन्य बाॅडीबिल्डर्स झाकोळले जात होते. पण सुनीत जाधवच्या अनुपस्थितीत रंगलेल्या मुंबई महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत अखेर तळवलकर्स जिमच्या माजी महाराष्ट्र श्री सागर कातुर्डे याने यश संपादन केले. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत माजी मुंबई श्री अतुल आंब्रे, रितेश नाईक, श्रीनिवास खारवी यांचे कडवे अाव्हान मोडीत काढत सागर कातुर्डेने प्रतिष्ठेच्या मुंबई महापौर श्री स्पर्धेवर आपले नाव कोरले. उपविजेतेपदाच्या संघर्षपूर्ण लढतीतही गोल्ड जिमच्या रितेश नाईकने अतुल अांब्रेला अनपेक्षित असा पराभवाचा धक्का देत बाजी मारली.


१०० बाॅडीबिल्डर्स, ४००० प्रेक्षक

मुंबई उपनगर बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशन आणि बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने अंधेरी पूर्वेला शेर-ए-पंजाब सोसायटीत भव्यदिव्य झालेल्या मुंबई महापौर श्री स्पर्धेत अंधेरीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. महापौर निधीतून या स्पर्धेसाठी केवळ दीड लाख रूपये मिळाले होते. पण संघटनेचे अध्यक्ष अमोल किर्तीकर यांनी मुंबई महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे दिमाखदार आयोजन केले. या स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूच सहभागी झाले होते. तर तब्बल चार हजार क्रीडाप्रेमींच्या अभूतपूर्व गर्दीने शेर-ए-पंजाब सोसायटीचे मैदान अक्षरशः फुलले होते.


हे ठरले गटविजेते

५५ किलो वजनी गटात नितीन शिगवणपेक्षा सरस प्रदर्शन करीत संदेश सकपाळने बाजी मारली. ६० किलो वजनी गटात नितीन म्हात्रेपुढे कुणाचीही मात्रा चालली नाही. ६५ किलो वजनी गटात गटविजेतेपदासाठी आदित्य झगडे आणि प्रतिक पांचाळ यांच्यात कंपेरिजन झाली, त्यात प्रतिक सरस ठरला. माँसाहेबचा श्रीनिवास खारवी ७० किलो वजनी गटात पहिला आला.७५ किलो गटात रितेश नाईकने आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत यश संपादन केले. पुढच्या गटात सागर कातुर्डेने बाजी मारली. सर्वात चुरस पाहायला मिळाली सर्वात शेवटच्या गटात. ८० किलोवरील गटात अतुल आंब्रेने सकिंदरचे आव्हान संपुष्टात अाणले. या गटात श्रीदीप गावडे आणि रोहन धुरी हेसुद्धा चांगल्या तयारीत होते.


सागरसमोर होते अतुल अांब्रेचे अाव्हान

गटाच्या लढतीनंतर किताबाच्या लढतीत अतुल आंब्रे भीमकाय वाटत होता, मात्र अनुभवी सागर कातुर्डेने त्याच्यापेक्षा आखीवरेखीव आणि पीळदार स्नायूंचे प्रदर्शन करीत अनपेक्षितपणे बाजी मारली. उपविजेतेच्या लढतीत अतुलपेक्षा रितेश नाईक वरचढ ठरला. हा निर्णय क्रीडाप्रेमींसाठी धक्कादायक होता. किताब विजेत्या सागर कातुर्डेला रोख ५१ हजार रुपये देऊन महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार अनिल परब यांच्या हस्ते गौरविण्यात अाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या