Advertisement

समीरची विक्रमादित्यवर मात


समीरची विक्रमादित्यवर मात
SHARES

संयुक्त आघाडीवरील मुंबईचा आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीची 31 व्या चालीनंतर बरोबरीची संधी भेदून इंटरनॅशनल मास्टर सांगलीच्या समीर कठमाळेने 80 व्या चालीला पांढऱ्या राजावर मात केली आणि दुसऱ्या रिलायन्स होम फायनान्स खुली फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीअखेर आघाडीचे राजेपण स्वतःकडे राखले. विक्रमादित्यची विजयी घोडदौड स्विस लीग पद्धतीच्या अकरापैकी सहाव्या फेरीत संपुष्टात आली. अग्रमानांकित राकेश कुलकर्णीविरुद्ध सावध खेळ करून इंटरनॅशनल फिडे (2248) गुणांकित बुद्धिबळपटू चिन्मय कुलकर्णीने बरोबरी साधली आणि गौरांग बागवे याच्यासोबत 5.5 गुणांसह संयुक्त द्वितीय स्थान मिळवले.

युनिव्हर्सल चेस फाउंडेशन आणि दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे दहिसर विद्यामंदिर शाळेच्या शेजारी समाज कल्याण केंद्रात सुरू असलेल्या स्पर्धेत विक्रमादित्य कुलकर्णी, राकेश कुलकर्णी, सौरव खेर्डेकर, अभिजित जोगळेकर, अमरदीप बारटक्के, राहुल पवार, अतुल डहाळे, संजीव मिश्रा, रणवीर मोहिते, मलय कृष्णा, मनोज बोरसे, अतुल काकडे, दिलीप गोलवणकर, प्रदीप आवाडे, विश्वा शाह आदी आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित बुद्धिबळपटू 5 गुणांसह तिसऱ्या स्थानाच्या संयुक्त आघाडीवर आहेत.

पहिल्या पटावर विक्रमादित्य कुलकर्णी विरुद्ध समीर कठमाळे या राज्यातील अव्वल दोन इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटूंमधील सहाव्या साखळी फेरीची लढत तब्बल साडेचार तास चुरशीची झाली. विक्रमादित्यने डावाची सुरुवात डी-4 प्याद्यासह स्लाव्ह डिफेन्स पद्धतीने केली. 31 व्या चालीपर्यंत डाव बरोबरीत राहण्याची चिन्हे दिसत होती. परंतु त्यानंतर समीर कठमाळेने आक्रमक पावित्रा घेत वजिराच्या सहाय्याने जोरदार मुसंडी मारली. अखेर समीरला 80 व्या चालीला विक्रमादित्याच्या राजाला जेरीस आणण्यात यश लाभले. त्याने अपराजित राहत सलग सहावा गुण वसूल केला. पाचव्या पटावर गौरांग बागवेने आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकन 400 ने भारी असलेल्या जीत शाहचा पराभव करून 5.5 गुणांसह द्वितीय स्थानावर झेप घेतली. गौरांगने गायको पिआनो पद्धतीने डावाची सुरुवात केली. 81 चालीपर्यंत रंगलेल्या डावामध्ये जीत शाहच्या चुकीच्या चालीचा लाभ उठवून गौरांगने विजय मिळवला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा