Advertisement

फिडे बुद्धिबळ स्पर्धेत राकेश कुलकर्णी आघाडीवर


फिडे बुद्धिबळ स्पर्धेत राकेश कुलकर्णी आघाडीवर
SHARES

फिडे अग्रगुणांकित राकेश कुलकर्णीने पुण्याच्या रणवीर मोहितेला दहाव्या साखळी सामन्यात 28 व्या चालीवर पराभूत केले आणि दुसऱ्या रिलायन्स होम फायनान्स खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत 9 गुणांसह आघाडी घेतली. इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळेला पराभूत करून दबदबा निर्माण करणारा रणवीर अखेर तेवढ्याच 8 गुणांवर राहिल्यामुळे समीर कठमाळे, विक्रमादित्य कुलकर्णी, सौरव खेर्डेकर, अतुल डहाळे, ओमकार कडव यांच्यासोबत संयुक्त तिसऱ्या आघाडीवर राहिला आहे. युनिव्हर्सल चेस फाऊंडेशन आणि दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे दहिसर येथील समाज कल्याण केंद्रामधील स्पर्धेत चिन्मय कुलकर्णी 8.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

पहिल्या क्रमांकाच्या पटावर रणवीर मोहितेने सुरुवातीच्या चालीत अनियमितता दाखविल्यामुळे त्याच्या डावात कमकुवतपणा आला. अनुभवी राकेश कुलकर्णीने त्याच्या चालीमधील गाफीलपणाचा लाभ उठवून अचूक खेळ केला. परिणामी राकेशच्या 28 व्या चालीला रणवीरच्या राजाला शरणागती पत्करावी लागली. दुसऱ्या पटावर आयएम समीर कठमाळे विरुद्ध चिन्मय कुलकर्णी लढत एकमेकांचा प्रारंभिक अंदाज घेत सुरू झाली. दोघांनीही 15 व्या चालीनंतर कोणताही धोका न पत्करता बरोबरी स्वीकारली.

तिसऱ्या पटावर आयएम विक्रमादित्य कुलकर्णी विरुद्ध एफएम सौरव खेर्डेकर यांच्यामध्ये सामना रंगला. सौरवकडे दोन प्याद्यांचे अधिक्य असताना राजा विरुद्ध वजीरच्या अंतिम डावात शहाची पुनरावृत्ती झाल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या बरोबरी मान्य करावी लागली. अन्य पटावर अतुल डहाळेने दीपक सोनीचा, ओमकार कडवने राहुल पवारचा, अमरदीप बारटक्केने अमर नंदूचा, विश्वा शाहने रिषी कदमचा, जीत शाहने पूजन शाहचा तर शुभम वेदने रुपेश भोगलचा पराभव करून विजयी गुण मिळवला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा