Advertisement

सुनित जाधवची फाइव्हस्टार कामगिरी, सलग पाचव्यांदा 'महाराष्ट्र श्री'


सुनित जाधवची फाइव्हस्टार कामगिरी, सलग पाचव्यांदा 'महाराष्ट्र श्री'
SHARES

डोळे दिपवणारं अभूतपूर्व आयोजन, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष आणि मुंबईकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद... वांद्रे इथं रविवारी रंगलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच जेतेपदाचा पंच मारला. जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या महेंद्र चव्हाण, आजी-माजी मुंबई श्री सुजन पिळणकर आणि अतुल आंब्रेवर मात करीत सुनीतने सलग पाचव्यांदा महाराष्ट्र श्री किताबाला गवसणी घालण्याचा भीमपराक्रम केला. फिजीक स्पोर्टस प्रकारात पुणेकरांनी बाजी मारली. पुरूषांमध्ये रोहन पाटणकर तर महिलांमध्ये स्टेला गौडे अजिंक्य ठरली. संपूर्ण स्पर्धेवर मुंबईकरांनी आपले वर्चस्व गाजवत सांघिक विजेतेपद पटकावले तर उपनगरनं उपविजेतेपदावर कब्जा केला.

सुनितचा जयघोष

वांद्रे पूर्वेला असलेले पीडब्ल्यूडी मैदान सायंकाळी पाच वाजताच खच्चाखच भरले होते. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्ससाठी दहा गटातील विजेते मंचावर आले तेव्हाच प्रेक्षकांमधून फक्त सुनितच्या नावाचाच जयघोष सुरू होता. अंतिम लढतीत सुनीत हा महेंद्र चव्हाण आणि अतुल आंब्रेवर मात करून सलग पाचव्यांदा बाजी मारणार हा विश्र्वास जमलेल्या पाच हजार मुंबईकरांना आधीपासूनच होता आणि तसेच झाले. महाराष्ट्र श्री विजेत्याचे नाव जाहीर करण्यापूर्वीच प्रेक्षकांनी सुनीतचा जयघोष करून त्याच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विजेत्या सुनीतला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह रॉयल एनफिल्ड बुलेट देऊन गौरविण्यात आले.

'मुंबई श्री'ची 'ठाणे श्री' विजेत्यावर मात

८५ किलो वजनी गटात गटविजेतेपदासाठी अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या गटातील पाचही खेळाडू भारी होते. गेल्या आठवड्यात मुंबई श्री झालेल्या सुजल पिळणकरची गाठ ठाणे श्री अजय नायरशी पडली. या दोघांचीही पंचांनी तुलना केली आणि आपला कौल सुजलच्या बाजुने दिला. मुंबई श्री स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या सकिंदर सिंगला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तर रोहित शेट्टी तिसरा आला.

मुंबईची हुकूमत, उपनगरचे वर्चस्व

यंदाही महाराष्ट्र श्री स्पर्धेवर मुंबईचेच वर्चस्व राहणार हे, आधीच स्पष्ट होते. मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी आपली ताकद अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिली. अंतिम फेरीत पुरस्कार पटकावणाऱ्या ४७ पैकी २८ खेळाडू मुंबई-उपनगरचे होते. त्यापैकी सहा गटात मुंबईकरांनी गटविजेतेपदाचा मान मिळविला. सुनितने महाराष्ट्र श्री जिंकून मुंबईला सांघिक विजेतेपदाचाही मान मिळवून दिला. मुंबईने ८० किलो वजनी गटात निर्भेळ यश संपादन केले. या गटातील तिन्ही पदके मुंबईच्याच सागर कातुर्डे, सुयश पाटील आणि सुशांत रांजणकर यांनी पटकावली.

फिजिक स्पोर्टसमध्ये पुणेकर सरस

मुंबई आणि उपनगरच्या खेळाडूंनी मुख्य स्पर्धा गाजवली तरी फिजिक स्पोर्टस प्रकारात पुणेकर सरस ठरले. पुरुषांच्या फिजिक स्पोर्टस् प्रकारात पुण्याच्या रोहन पाटणकरने सुवर्णमयी कामगिरी केली. पुण्याचाच किरण साठे दुसरा आला. तिसरे स्थान मुंबईकर रोहन कदमने संपादले. महिलांच्या मॉडेल स्पोर्टस प्रकारात पुण्याचीच स्टेला गौडे अव्वल ठरली. तिने मुंबईच्या डॉ. रिता तारीला मागे टाकून सुवर्णपदक जिंकले. पुण्याची आदिती बंग तिसरी आली.


हेही वाचा - 

महाराष्ट्र श्री किताब विजेत्याला मिळणार राॅयल एनफिल्ड



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा