Advertisement

'स्वामी समर्थ श्री'वरही सुनीतचाच कब्जा


'स्वामी समर्थ श्री'वरही सुनीतचाच कब्जा
SHARES

मुंबई श्री, महाराष्ट्र श्री अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धांवर आपले नाव कोरल्यानंतर सुनीत जाधवने अाता स्वामी समर्थ श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतही आपली ताकद दाखवली. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंच्या उपस्थिती लाभली होती. त्यामुळे चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सुनीत जाधवच्या झंझावातापुढे अन्य बाॅडीबिल्डर्स पुरते निष्प्रभ ठरले. दिमाखदार झालेल्या या स्पर्धेत माजी महाराष्ट्र श्री विजेत्या सागर कातुर्डेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.


अायोजकांच्या अाग्रहाखातर सुनीत उतरला

स्वामी समर्थ श्रीच्या भव्यदिव्य आयोजनामुळे या स्पर्धेला क्रीडाप्रेमींची अलोट गर्दी उसळली होती. प्रत्येक गटात एकापेक्षा एक सरस खेळाडू असल्यामुळे क्रीडाप्रेमींना शरीरसौष्ठव स्पर्धेचा जबरदस्त पीळदार थरार प्रत्यक्ष अनुभवता अाला. या स्पर्धेत सुनीत जाधवचे खेळणे निश्चित नव्हते, परंतु क्रीडाप्रेमी आणि आयोजकांच्या आग्रहाखातर त्याने शेवटच्या क्षणी आपले नाव नोंदवले. सुनीतला आव्हान देण्यासाठी अक्षय मोगरकर, सुजल पिळणकर, सकिंदर सिंग आणि सागर कातुर्डे आधीपासून सज्ज होते. या स्पर्धेला राज्यभरातून ७९ शरीरसौष्ठवपटूंची उपस्थिती लाभली होती. त्यात मुंबई, उपनगरसह ठाणे, पुणे, रायगड या शहरांमधील खेळाडूंचाही मोठा सहभाग होता.


सुनीतसमोर सर्व ठरले निष्प्रभ

प्रत्येक गटात झालेल्या संघर्षानंतर अंतिम फेरीत सुनीतची गाठ सहा गटविजेत्यांशी पडली. ८५ किलोवरील वजनी गटामधून स्पर्धेचा विजेता ठरणार, हे निश्चित झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडू अक्षय मोगरकर, मुंबई श्री सुजल पिळणकर आणि मुंबई श्रीचा उपविजेता सकिंदर सिंग यांचे अाव्हान सुनीतसमोर होते. पण या तिघांपैकी कुणाचाही निभाव सुनीतसमोर लागला नाही. सुनीतने स्वामी समर्थ श्री स्पर्धेवर सहजगत्या आपले नाव कोरले. या स्पर्धेत सात गटात दीड लाखांची रोख बक्षिसे देण्यात अाली. स्वामी समर्थ श्री किताब विजेत्या सुनीतला ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक अाणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा