एमआयजी आणि कर्नाटक स्पोर्टिंगची विजयी सलामी

 Goregaon
एमआयजी आणि कर्नाटक स्पोर्टिंगची विजयी सलामी
Goregaon , Mumbai  -  

प्रबोधन गोरेगाव आयोजित 10 व्या प्रबोधन मुंबई टी-20 क्रिकेट स्पर्धेत एमआयजी आणि कर्नाटक स्पोर्टिंग या संघांनी विजयी सलामी दिली. एमआयजी संघाने चार वेळा या स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळवणाऱ्या बलाढ्य डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीवर 5 धावांनी निसटता विजय मिळवला. तर क्रॉस मैदान येथे झालेल्या दुसऱ्या लढतीत कर्नाटक स्पोर्टिंग संघाने फोर्ट विजय संघावर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

या स्पर्धेचं उद्घाटन भारताचे माजी कसोटीवीर लालचंद राजपूत यांनी केलं. त्यावेळी आमदार संजय पोतनीस प्रबोधन गोरेगावचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

डी.वाय. पाटील संघाने प्रतिस्पर्धी एमआयजी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर त्यांनी कर्णधार केविन अल्मेडा 62 धावांच्या दमदार खेळीमुळे निर्धारित 20 षटकात सर्वबाद 172 धावांचे लक्ष्य उभारले. अल्मेडला संदीप कुंचीकोर (26) आणि साहिल माणगावकर (32) यांनी चांगली साथ दिली. डीवायपाटील संघासाठी आनंद बैस याने 9 धावात 4 बळी घेतले. तर विनीत सिंह आणि सर्वेश दामले यांनी प्रत्येकी दोन बळी घेतल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना डीवाय पाटील संघाने 17 धावत 2 बळी गमावले होते. पण पंकज जैस्वाल (30), कर्णधार योगेश ताकवले (35) आणि योगेश पवार (61) यांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र विनीत धुळप याने (19 धावत 5 बळी) टिच्चून गोलंदाजी करत एमआयजी संघाला 5 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. या स्पर्धेत विनीत धुळप हा सामनावीर ठरला.

दुसऱ्या लढतीत कर्नाटक संघाने फोर्ट विजयला 9 बाद 121 धावत रोखून अर्धी लढाई जिंकली होती. त्यावर कौस्तुभ पवार याने केवळ 43 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकार यांच्या सहाय्याने नाबाद 78 धावा करून संघाचा विजय साकारला. कर्नाटक संघाने हे लक्ष्य 14.1 षटकातच पूर्ण केले.

Loading Comments