Advertisement

शिरीष राणेचे ‘तेरा दिवस प्रेमाचे’

प्रायोगिक रंगभूमी, एकांकिका आणि व्यावसायिक रंगभूमी असा यशस्वी प्रवास करणाऱ्या शिरीषच्या नाटकांनी राज्य नाट्यस्पर्धांमध्येही सहभाग घेत शाबासकी मिळवली आहे. ३ वर्षांपूर्वी शिरीषने ‘लव्ह इन रिलेशनशीप’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणलं होतं. त्यानंतर ‘तेरा दिवस प्रेमाचे’ हे शिरीषचं दुसरं नाटक आहे.

शिरीष राणेचे ‘तेरा दिवस प्रेमाचे’
SHARES

श्रावण सुरू होताच जसा मराठी सणांना प्रारंभ होतो, तसाच नव्या नाटकांचा हंगामही सुरू होतो. यंदाही ऐन श्रावणात नव्या नाटकांचा ताटवा फुलणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. यात दिग्दर्शक शिरीष राणेच्या ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकाचाही समावेश आहे.

शिरीष राणेबद्दल सांगायचं तर ‘जन्म’ या सिनेमात आई-मुलीची एक भावस्पर्शी कथा सादर केल्यानंतर सिनेमा आणि नाटक अशा दोन्ही माध्यमांमध्ये वावरलेला हा उमदा दिग्दर्शक. नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासाने पछाडलेला शिरीषचा ‘आता बस्स’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. अशातच तो सध्या ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकाच्या कामातही व्यग्र आहे. या नाटकाबाबत शिरीषने ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्ल्युझीव्ह संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या.


३ वर्षांनी पुनरागमन

प्रायोगिक रंगभूमी, एकांकिका आणि व्यावसायिक रंगभूमी असा यशस्वी प्रवास करणाऱ्या शिरीषच्या नाटकांनी राज्य नाट्यस्पर्धांमध्येही सहभाग घेत शाबासकी मिळवली आहे. ३ वर्षांपूर्वी शिरीषने ‘लव्ह इन रिलेशनशीप’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणलं होतं. त्यानंतर ‘तेरा दिवस प्रेमाचे’ हे शिरीषचं दुसरं नाटक आहे.



पुन्हा आनंद म्हसवेकर

पुन्हा एकदा लेखक आनंद म्हसवेकरांसोबत काम करण्याबाबत शिरीष म्हणाला की, ते माझे आवडते लेखक आहेत. त्यांच्या लेखनशैलीत एक वेगळंच आकर्षण असतं, जे मला आकर्षित करतं. ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकाच्या कथानकाच्या वेळीही असंच घडलं. नाटकाचा जाॅनर आणि ते कागदावर उतरवण्याची म्हसवेकरांची शैली अफलातून आहे.


वेगळ्या प्रकारची काॅमेडी

या नाटकाचा आशय सामाजिक असला तरी तो एका कुटुंबाशी निगडीत असल्याने रसिकांना एका वेगळ्याच विषयावर आधारित असलेलं नाटक पाहायला मिळेल. यात लव्हस्टोरीही आहे आणि पती-पत्नीचे संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. याला ब्लॅक कामेडी असंही म्हणता येणार नाही. कारण त्या काॅमेडीतही अंडरकरंट मेसेज दडलेला आहे. यातील प्रासंगिक विनोद रसिकांना खदखदून हसवतील.


पती-पत्नीची गोष्ट

या नाटकात पती-पत्नी गोष्ट पाहायला मिळेल. यांच्या शेजारी एक घटना घडते. त्यामुळे दोघांमध्ये काही गैरसमज निर्माण होतात. त्याचं त्यांच्या जीवनात कशाप्रकारे रिफ्लेक्शन होतं ते विनोदी पद्धतीने या नाटकात मांडण्यात आलं आहे.



अरुण नलावडे मुख्य भूमिकेत

अरुण नलावडेंसोबत मी ‘आई गं’ नावाचा सिनेमा केला होता. त्यात त्यांनी जबरदस्त अभिनय केला होता. हे नाटकही काहीसं त्याच पठडीतील असल्याने नलावडेंची आठवण झाली. ते सुद्धा ही भूमिका एन्जाय करत आहेत. त्यांच्या जोडीला माधवी दाभोळकर, शर्वरी गायकवाड, देवेश काळे, संजय क्षेमकल्याणी, संजय देशपांडे, मेघना साने हे कलाकार आहेत.


यानंतर पुढे काय?

‘आता बस्स’ हा सिनेमा आॅक्टोबरमध्ये प्रदर्शित होईल. त्यानंतर ‘दिल दोस्ती दिवानगी’ ही मालिका सुरू करणार आहे. याशिवाय ‘अभिनेत्री’ या सिनेमावरही काम सुरू करेन. ‘आता बस्स’ प्रदर्शित होण्यापूर्वी ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकावर अधिकाधिक भर द्यायचा आहे. शुभारंभ होण्यापूर्वीच या नाटकाच्या ६ प्रयोगांचं बुकिंगही झालं आहे. अनुराधा सामंत यांच्या अनुराधा फॅक्टरी आणि जिव्हाळा या संस्थांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.



हेही वाचा-

‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चं नाबाद त्रिशतक

चाळीशीतील महिलांची कथा सांगणार ‘नॉटी ४t’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा