• चाळीशीतील महिलांची कथा सांगणार ‘नॉटी ४t’
SHARE

रंगभूमीवर नेहमीच विविधांगी विषयांवर आधारित नाटकं येत असतात. काही सत्यघटनांवर आधारित असतात, तर काही काल्पनिक. काही दैनंदिन जीवनाशी निगडीत, तर काही खट्याळ असतात. अलीकडेच रंगभूमीवर आलेलं ‘नॉटी ४t’ हे नाटक अशाच खट्याळांची कथा सांगणारं आहे.


वाह रंग! प्रोडक्शन्स निर्मित आणि चंद्रवलय प्रकाशित ‘नॉटी ४t’ या नाटकाची निर्मिती अविनाश वारंग यांनी केली असून सुनील परब दिग्दर्शक आहेत. या नाटकात चाळीशीतील महिला आणि त्यांच्या पतीची कथा आहे.


काय आहे कथा?

आशु आणि नीता या प्रेमविवाह झालेल्या एका जोडप्याची कथा या नाटकात आहे. लग्नाला २३ वर्षे लोटलेल्या आशु-नीताच्या संसारवेलीवर दोन फुलं फुललेली आहेत. त्यांची दोन्ही मुलं पाचगणीला शिकताहेत. आशु बीएमसीत इंजिनीयर पदावर कार्यरत आहे, तर नीता एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करते.

स्त्रियांना चाळीशीमध्ये भेडसावणाऱ्या शारीरिक समस्यांना अधोरेखित करताना पुरुषांच्या मानसिकतेचं दर्शन घडवणारं हे नाटक हसता हसता अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं आहे. २३ वर्षे सुखाने संसार केल्यानंतरही या दोघांच्या जीवनात असा कोणता प्रसंग येतो ज्यामुळे दोघेही टोकाची भूमिका घ्यायला तयार होतात ते पाहणं केवळ रोमांचकच नसून वास्तवतेचं दर्शन घडवणारंही आहे.

करियर आणि संसार यांच्यातील ताळमेळ साधताना आपण कित्येकदा तडजोडी करत असतो. यातील काही तडजोडी शारीरिक, तर काही मानसिक असतात. चाळीशीमध्ये गेल्यावर काहींच्या मनातील इच्छा उचंबळून येतात आणि त्यांचं मन भरकटू लागतं. या परिस्थितीत कित्येकदा त्यांच्याकडून चुकीची पावलंही उचलली जातात. त्यासाठी किती किंमत मोजावी लागते त्याची गोष्ट या नाटकात पाहायला मिळते.
- सुनील परब, दिग्दर्शक

वंदना राणे-जोगी, अविनाश वारंग, स्नेहा जोशी, चंद्रशेखर पांचाळ, नितीन सुरेश, सुधीर श्रीधर आणि संजीव धुरी या कलाकारांनी या नाटकात विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या