Advertisement

देशपांडेंसोबत 'पंचविशीत' परतणार संजय!


देशपांडेंसोबत 'पंचविशीत' परतणार संजय!
SHARES

काही कलाकार अभिनयाच्या बळावर आपला असा काही चाहता वर्ग तयार करतात की, केवळ रसिकच नव्हे तर लेखक-दिग्दर्शकांनाही त्यांच्या सोबत पुन: पुन्हा काम करण्याचा मोह आवरत नाही. अशाच कलाकारांपैकी एक आहे संजय नार्वेकर. रंगभूमीपासून मोठ्या पडद्यापर्यंत यशस्वीरीत्या गरूडझेप घेत संजयनं नेहमीच विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आता तो लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडेंसोबत पंचविशीत परतणार आहे.


होते कुरूप वेडे

मराठी रंगभूमीवर वेगवेगळे नाट्यप्रयोग सातत्यानं होत असतात. आपल्याकडे जे चांगलं आहे, त्यापेक्षा दुसऱ्यांकडे काय आहे ते जाणून घेण्यासाठी व जे नाही ते मिळवण्यासाठी माणूस नेहमीच धावत असतो. याच मनोवृत्तीवर अत्यंत मार्मिक भाष्य करणारं 'होते कुरूप वेडे' हे धमाल विनोदी नाटक लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे लवकरच रंगभूमीवर घेऊन येत आहेत. या नाटकात संजय नार्वेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


पंचविसावं नाटक

'वरवरच्या सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य महत्त्वाचं ते जपा', असा संदेश देणारं हे नाटक आहे. या नाटकात प्रमुख भूमिकेत असलेला संजय या नाटकाद्वारे रसिकांना हास्याची मेजवानी देणार आहे. विशेष म्हणजे या नाटकाद्वारे संजय 'पंचविशीत' परतणार आहे. 'पंचविशीत' म्हणजे 'होते कुरूप वेडे' हे त्यांचं रंगभूमीवरचं पंचविसावं नाटक आहे. यासोबत आणखी एक सुरेख योगायोग म्हणजे या नाटकाचे लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचंही हे पंचविसावं नाटक आहे.


आनंदाची गोष्ट

संजय आणि मी अनेक वर्ष एकत्र काम करत असून 'होते कुरूप वेडे'च्या निमित्तानं आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करत आहोत. इतक्या वर्षांचा दोघांचा हा अनुभव या नाटकाला नक्कीच वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वासही देशपांडे यांनी व्यक्त केला. तर राजेशसारख्या दिग्दर्शकासोबत काम करणं म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची एक चिरंतन प्रक्रिया आहे. या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजेशसोबत काम करायला मिळालं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असं म्हणत संजयनं आपल्या भावना व्यक्त केल्या.


शुभारंभाचा प्रयोग ११ जानेवारीला

संजयसोबत या नाटकात नयन जाधव, भारत सावले, शलाका पवार, नितीन जाधव, मिनाक्षी जोशी, कल्पेश बाविस्कर हे कलाकार भूमिका साकारणार आहेत. डिएसपी एन्टरटन्मेंट प्रा.लि. निर्मित 'होते कुरूप वेडे' या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन राजेश देशपांडे यांनी केलं असून, निर्मिती दादासाहेब पोते यांची आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचं आहे, तर संगीत आमीर हडकर यांनी दिलं आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे, तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. 'होते कुरूप वेडे' या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार ११ जानेवारीला, शिवाजी मंदीर येथे दुपारी रंगणार आहे.


हेही वाचा -

'डोंबिवली रिटर्न'साठी प्रथमच एकत्र आले संदीप-राजेश्वरी

नव्या वर्षात 'बायोपिक'चं पीक जोमात!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा