Advertisement

EXCLUSIVE : मृणालच्या विराजसने ‘सव्वीशी’त गाठली ‘पासष्ठी’!

जन्मजात हुषार असलेल्या विराजसला घरातच लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाचं बाळकडू पाजलं गेलं. सुरुवातीच्या काळात एकांकिकांचं लेखन करणाऱ्या विराजसची पावलं ‘होस्टेल डेज’ या चित्रपटाच्या निमित्ताने रूपेरी पडद्याकडे वळली असली तरी रंगभूमीशी त्याची नाळ अद्याप जोडलेली आहे.

EXCLUSIVE : मृणालच्या विराजसने ‘सव्वीशी’त गाठली ‘पासष्ठी’!
SHARES

ऐकावं ते नवलंच! म्हणतात ते काही खोटं नाही... गोड चेहऱ्याची कसदार अभिनेत्री म्हणून मराठी-हिंदी सिनेसृष्टीत ख्याती असलेल्या मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजसही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अशक्यप्राय वाटणाऱ्या आव्हानांना गवसणी घालण्याचं धाडस करत आहे. मराठी रंगभूमीवर आलेल्या नव्या नाटकात चौफेर कामगिरी करत विराजस पासष्ठीतील वृद्धाची भूमिका साकारत आहे. याबाबत ‘मुंबई लाइव्ह’शी एक्स्क्लुझीव्ह बातचीत करताना विराजसने नाटकाच्या दीर्घ प्रवासाबाबत विस्ताराने सांगितलं.



घरातच बाळकडू 

तसं पाहिलं तर आज किंवा यापूर्वीही विराजसला आपल्या आईचं म्हणजेच मृणाल कुलकर्णी यांच्या नावाचा वापर करण्याची गरज भासली नाही. जन्मजात हुषार असलेल्या विराजसला घरातच लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाचं बाळकडू पाजलं गेलं. सुरुवातीच्या काळात एकांकिकांचं लेखन करणाऱ्या विराजसची पावलं ‘होस्टेल डेज’ या चित्रपटाच्या निमित्ताने रूपेरी पडद्याकडे वळली असली तरी रंगभूमीशी त्याची नाळ अद्याप जोडलेली आहे. नाट्यरसिकांसाठी विराजस आणि थिएट्रॅान एन्टरटेन्मेंट ही संस्था ‘मिकी’ हे नाटक घेऊन आली आहे.


६ वर्षांपूर्वी लिहिली संहिता

‘मिकी’ या नाटकाबाबत विराजस म्हणाला की, शिवराज वायचळ, सूरज पारसनीस अशा आम्ही काही मित्रांनी मिळून जवळजवळ सात-आठ वर्षांपूर्वी थिएट्रॅान एन्टरटेन्मेंट ही संस्था सुरू केली होती. या अंतर्गत आजवर १२ नाटकं सादर केली आहेत. ‘मिकी’ हे या संस्थेचं पहिलंच दोन अंकी नाटक आहे. याची संहिता मी सहा वर्षांपूर्वी लिहिली होती. त्यावर टप्प्याटप्प्याने बारकाईने, लहानसहान गोष्टींवर कायम काम सुरू होतं. आता ही संहिता नाटकाच्या रूपात प्रेक्षकांसमोर आल्याने खूप आनंदी आहे.


८० च्या दशकातील काळ

‘मिकी’मध्ये १९८४ चा काळ आहे. या नाटकाची कथा पुण्यात घडते. एका नाभिकाला पैशांअभावी आपलं दुकान जाईल की काय अशी भीती असते. त्यामुळे तो एक प्लॅन आखतो. त्यानुसार मेलेल्या व्यक्तीच्या आधारे कशा प्रकारे आलेल्या संकटांचा सामना केला जाते ते या नाटकात पहायला मिळेल. लेखनासोबतच सूरज पारसनीससोबत मी या नाटकाचं दिग्दर्शनही केलं आहे. 


विषयाच्या मागणीमुळे २ अंकी

खरं तर या संहितेवर दोन अंकी नाटकाचा विचार नव्हता, पण विषयाची मागणी तशी असल्याने आम्ही हे धाडस केलं आहे. एकांकिकेमध्ये हा विषय मावणारा नव्हता. दोन अंकी नाटकात विषयाला योग्य न्याय मिळेल असं आम्हाला वाटलं. यातील मध्यंतराचा पॅाइंट खूप जबरदस्त असून, नाटकाच्या पुढील अंकात काय घडेल याबाबत उत्कंठा वाढवणारा आहे.


६५ वर्षांचा वृद्ध

लेखन-दिग्दर्शनासोबतच मी या नाटकात एक व्यक्तिरेखाही साकारली आहे. यातील ६५ वर्षांच्या सखाराम नाभिकाची व्यक्तिरेखा मी साकारत आहे. केवळ गेटअपच्या माध्यमातूनच नव्हे, तर सहा वर्षे केलेल्या अभ्यासातून ही व्यक्तिरेखा रंगमंचावर सादर करण्याची हिंमत करत आहे. माझं माझ्या आजोबांशी खूप जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांच्या वागण्या-बोलण्यातून वृद्धांच्या सवयी शिकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून जी व्यक्तिरेखा उमगली ती ‘मिकी’मध्ये सादर करत आहे.


पुलं-वपुंचा प्रभाव

लहानपणापासून पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे या थोर साहित्यिकांचं कथाकथन ऐकलं आहे. त्यांच्याकडून ८४ मधील वयोवृद्ध व्यक्ती कशाप्रकारे व कोणत्या विषयावर गप्पा मारत होत्या याची जाणीव झाल्याने व्यक्तिरेखा साकारणं सोपं गेलं. नाटक लिहितानाच ही व्यक्तिरेखा आपणच साकारणार असल्याचं डोक्यात असल्याने त्या दृष्टीने रिसर्चही करत राहिलो. मेकअप आर्टिस्ट केदार सोनपाठकी यांनी त्यावर कळस चढवत मला ६५ वयाच्या वृद्धासारखा गेटअप केला आहे. यासाठी प्रत्येक वेळी अर्धा-पाऊण तास लागतो.


शेक्सपिअर टच

या नाटकाचा जॅानर खूप वेगळा असल्याने भारतीय प्रेक्षक हे स्वीकारतील की नाही याची सुरुवातीला भीती होती. पण पुण्यातील थिएटर अॅकॅडमीच्या सकल ललित कलाघर यांच्या सहकार्यातून सादर केलेल्या पहिल्या प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद पाहून आत्मविश्वास वाढला आहे. हे नाटक जरी ब्लॅक कॅामेडी या पठडीत मोडणारं असलं, तरी त्याला महान लेखक शेक्सपियरन ट्रॅजिडीचा टच देण्याचा प्रयत्न केला आहे.


नोव्हेंबरपासून नियमीत प्रयोग

या नाटकात माझ्यासोबत सूरज, शिवराज वायचळ, ओंकार गोखले आणि गौरव बर्वे यांच्या भूमिका आहेत. निषाद गोळंबरे यांनी या नाटकाला संगीत दिलं असून, यातील गाणी आणि संगीत ओरिजनल आहे. विक्रांत पवार यांनी साऊंड डिझाइन, तर सचिन दुकाने यांनी प्रकाशयोजना केली आहे. नोव्हेंबरपासून या नाटकाचे नियमीत प्रयोग करण्याची योजना आखण्यात आली आहे.



हेही वाचा - 

मराठी रंगभूमीला लागले सिक्वेलचे वेध!

पृथ्वी थिएटरची चाळीशी!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा