Advertisement

‘अलबत्या गलबत्या’चं शतक आणि ५ प्रयोगांचा विक्रम

प्रशांत दामले यांनी एकाच दिवशी एकाच थिएटरमध्ये एकाच नाटकाचे सलग ३ प्रयोग सादर करत विक्रम नोंदवला होता. त्यांचाच कित्ता गिरवत ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या वैभव मांगले आणि त्याच्या टीमने १५ आॅगस्ट रोजी शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. सोबतच नाटकाच्या शतकी प्रयोगाचा पल्लाही गाठला.

‘अलबत्या गलबत्या’चं शतक आणि ५ प्रयोगांचा विक्रम
SHARES

एकाच दिवशी एकाच नाटकाचे ५ प्रयोग करण्याचा विक्रम मराठी रंगभूमीवर यापूर्वीच नोंदवण्यात आला असला, तरी ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाच्या टीमने बुधवारी एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. शतकी प्रयोगासोबतच सलग ५ प्रयोग सादर करून या टीमने स्वातंत्र्यदिनी अखंड मेहनतीच्या जोरावर दूग्धशर्करा योग जुळवून आणला.


कुठे नोंदवला विक्रम?

अलिकडच्या काळात प्रशांत दामले यांनी एकाच दिवशी एकाच नाटकाचे सलग ३ प्रयोग सादर करत विक्रम नोंदवला होता. त्यांच्या एक पाऊल पुढे टाकत ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या वैभव मांगले आणि त्याच्या टीमने १५ आॅगस्ट रोजी शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये नव्या विक्रमाची यशस्वी नोंद केली आहे. सोबतच नाटकाच्या शतकी प्रयोगाचा पल्लाही गाठला. या विक्रमाची नोंद लिम्का बुकमध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.



'हे' कलाकारही होते हजर

या प्रयोगाला अतुल परचुरे, सोनिया परचुरे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, निलेश दिवेकर आदी मराठी सिनेसृष्टीतील कलाकार उपस्थित होते. शंभरावा प्रयोग सादर केल्यानंतर ‘अलबत्या गलबत्या’चा दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरसह ‘अलबत्या गलबत्या’च्या संपूर्ण टीमने केक कापून आपला आनंद साजरा केला.


वैभवचा दंडवत

याप्रसंगी चिन्मयने संपूर्ण टीमच्या वतीने वैभवला बोलण्याची संधी दिली. वैभवने सर्वप्रथम रंगमंचावर डोकं टेकवून सर्व रसिकांना साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना तो रसिकांना उद्देशून म्हणाला की, हे यश तुमच्यामुळे मिळालं आहे. त्यामुळेच तुम्हाला हा साष्टांग नमस्कार केला. तुम्ही पहिल्या प्रयोगापासूनच या नाटकाला गर्दी केलीच, पण भरभरून दादही दिली. इतकंच नव्हे तर इतर रसिकांनाही हे नाटक पाहण्यासाठी प्रवृत्तही केलंत. आज जे सलग ५ प्रयोग सादर झाले ते केवळ तुमची साथ आणि शुभेच्छांमुळेच. यापुढेही अशीच साथ राहू द्या अशी विनंतीही वैभवने केली.



अबालवृद्धांवर मोहिनी

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी एके काळी गाजवलेलं रत्नाकर मतकरी लिखित या नाटकात वैभव मांगले चेटकीणीची भूमिका साकारत आहे. चिंची नावाची चेटकीण साकारताना तो रसिकांमध्ये उपस्थित असलेल्या बच्चे कंपनींशी संवाद साधत त्यांनाही या नाटकाच्या प्रवासात सोबत घेऊन जातो. याच कारणामुळे या नाटकाने अबालवृद्धांवर जणू मोहिनी घातली आहे.

वैभवसोबत या नाटकात सनीभूषण मुणगेकर शीर्षक भूमिकेत आहे. याशिवाय बाळकृष्ण वानखेडे, कुणाल धुमाळ, दिलीप कराड, सागर सातपुते, संदिप रेडकर, दीपक कदम, सायली बनकर, श्रद्धा हांडे यांच्याही या नाटकात भूमिका आहेत. राहुल भंडारे यांनी अद्वैत थिएटर अंतर्गत निर्मिती केलेल्या या नाटकाचे प्रस्तुतकर्ते झी मराठी आहे. संदेश बेंद्रे यांनी या नाटकाचा सुरेख सेट डिझाइन केला असून, उलेश खंदारे यांनी कलाकारांना मेकअप केला आहे. गोट्या सावंत या नाटकाचे सूत्रधार आहेत.



हेही वाचा-

Exclusive: 'एक' चेटकीण करतेय अाबालवृद्धांवर जादू!

विजयादशमीच्या मुहूर्तावर येणार मतकरींचं ‘आरण्यक’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा