Advertisement

Exclusive: 'एक' चेटकीण करतेय अाबालवृद्धांवर जादू!

पूर्वी गोष्टीतली चेटकीण म्हटलं की, लहान मुलांच्या जीवाचा अक्षरश: थरकाप व्हायचा. पण रंगभूमीवरील ही चेटकीण लहान मुलांसह पालकांवरही मोहिनी घालत आहे.

Exclusive: 'एक' चेटकीण करतेय अाबालवृद्धांवर जादू!
SHARES

मराठी रंगभूमीवर सध्या एक चेटकीण धुमाकूळ घालत आहे. पूर्वी गोष्टीतली चेटकीण म्हटलं की, लहान मुलांच्या जीवाचा अक्षरश: थरकाप व्हायचा. पण रंगभूमीवरील ही चेटकीण लहान मुलांसह पालकांवरही मोहिनी घालत आहे. होय... ही चेटकीण आहे... वैभव मांगले साकारत असलेली 'अलबत्या गलबत्या' नाटकातील चेटकीण.



‘अलबत्या गलबत्या’ या बहुचर्चित नाटकाने अबालवृद्धांना अक्षरश: वेड लावलं आहे. ‘हाऊसफुल्ल’ या बोर्डसह तुफान गर्दीत या नाटकाचे प्रयोग मुंबई-पुण्यात सुरू आहेत. जो नाटक पाहतो, तो या चेटकीणीचेच गोडवे गातोय. लहान मुलंही यात मागं नाहीत. सेलिब्रिटीजच्या मुलांसाठी तर वैभव सध्या आयकॅान बनला आहे. थोडक्यात काय तर या चेटकिणीने सर्वांवर अशी काही जादू केली आहे की, शाळा सुरू झाल्या तरी ‘अलबत्या गलबत्या’चे प्रयोग हाऊसफुल्ल होत आहेत. या चेटकिणीने म्हणजेच वैभवने ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्ल्युझिव्ह बातचीत करत ‘अलबत्या गलबत्या’विषयी भरभरून गप्पा मारल्या...



एकीकडे कुलकर्णी, दुसरीकडे चेटकीण

आज वैभव एकीकडे ‘मेरे साई’ या मालिकेत दुष्ट कुलकर्णीच्या भूमिकेत आहे, तर दुसरीकडे ‘अलबत्या गलबत्या’मध्ये चेटकीण बनला आहे. अशा प्रकारची संधी नशीबानं मिळत असल्याचं मानणारा वैभव म्हणाला की, ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेनंतर चांगल्या कामाच्या शोधात होतो. त्यावेळी ‘वाडा चिरेबंदी’ सुरू होतं आणि ‘मेरे साई’ या हिंदी मालिकेत काम करण्याची आॅफर आली. अशातच ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकासाठी झी मराठीचे निलेश मयेकर यांचा फोन आला.


कदाचित नाहीसुद्धा म्हटलं असतं...

या नाटकात काम करण्यासाठी एखाद्या निर्मात्याने विचारलं असतं तर कदाचित नाहीसुद्धा म्हटलं असतं. कारण या नाटकाचा डोलारा खूप मोठा आहे, पण झीसारख्या प्रॅाडक्शन हाऊसकडून विचारणा झाल्याने काहीतरी भव्य-दिव्य असणार याची खात्री होती. मला ही सुवर्णसंधी सोडायची नव्हती. रसिक हे नाटक आणि माझी भूमिका एवढी डोक्यावर घेतील अशी पुसटशीही कल्पना त्यावेळी नव्हती.



जादू नव्हे, मेहनतीचं फळ...

कधी विनोदी, तर कधी खालनायकी भूमिकांमध्ये दिसणाऱ्या वैभवने मागील दीड महिन्यापासून चेटकिण बनून मराठी रंगभूमीवर धुमाकूळ घातला आहे. याबाबत वैभव म्हणाला की, ही जादू नाही. घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे. आपण केलेलं काम रसिकांना आवडतं यापेक्षा दुसरं समाधान नाही. दिलीप प्रभावळकरांनी फार वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर केलेली चेटकीण लक्षवेधी ठरली होती.


चिन्मयच्या मुलाला करायचंय टक्कल

या नाटकाचं दिग्दर्शन लेखक-अभिनेता-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरने केलं आहे. हे नाटक पाहिल्यावर चिन्मयचा मुलगा वैभवच्या इतका प्रेमात पडला की. वैभवला जणू आपला आयडॅालच मानू लागला. वैभवकाकाप्रमाणे मलाही टक्कल करायचं आहे, असा हट्टच त्याने धरल्याचं स्वत: चिन्मयने ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितलं.



...आणि मुलं चेटकिणीला शोधतात

नाटकानंतरचे किस्से सांगताना वैभव म्हणाला की, नाटक संपल्यावर चेटकिणीला भेटण्यासाठी मुलांसोबत पालकांचीही तोबा गर्दी होते. मी लगेच मेकअप उतरवून मुलांना भेटतो, तेव्हा मुलं चेटकिणीला शोधत असतात. मीच चेटकीण बनलो होतो असं सांगून त्यांचा विश्वास बसत नाही. चेटकिणीला भेटण्यासाठी चक्क रडायला लागतात. आज मी साकारत असलेल्या चेटकिणीनं कायमचं त्यांच्या मनात घर केलं आहे. ते जेव्हा मोठे होतील, तेव्हा ती त्यांना आठवेल की नाही हे सांगता येत नाही.


रात्रभर झोपली नाहीत समीहन-पौलामी...

मुलगा समीहन आणि मुलगी पौलामी यांना मी एकदा चेटकिणीसारखं हसून दाखवलं. त्यावर ते इतके घाबरले की, रात्रभर झोपलेच नाहीत. संपूर्ण रात्रभर जागे होते. सुबोध भावेचा मुलगा आणि दिग्दर्शक विजू मानेची मुलगी यांनीही हे नाटक पाहिलं आणि ते देखील मी साकारलेल्या चेटकिणीच्या प्रेमात पडले.



थँक यू काका...

पुण्यातील प्रयोग संपल्यानंतर एक मुलगा आला आणि थेट माझ्या पाया पडला. तो म्हणाला, “थँक यू काका... हे नाटक आमच्यासाठी आणलंत म्हणून...” त्याचे ते शब्द ऐकून मी काहीसा स्तब्ध झालो. आज आपल्याकडे मुलांना दाखवण्यासाठी बालनाट्यच नाहीत याची जाणीव क्षणार्धात झाली. त्या मुलाच्या एका वाक्यात खूप मोठा आशय दडला होता. बालनाट्य येत नसल्याची खंत होती.


खिशात घालून घेऊन जावी...

पालकही हे नाटक खूप एन्जॅाय करत आहेत. याची कल्पना अभिनेत्री नंदिता धुरीने दिलेल्या प्रतिक्रियेवरून सहज येते. वैभव म्हणाला की, नंदिताने हे नाटक पाहिल्यावर ‘ही चेटकीण गुपचूप खिशात घालून घरी घेऊन जावी अशी आहे’, असं म्हटलं. त्यातच सारं काही आलं.



चिन्मयचं पोषक दिग्दर्शन...

खरं तर चिन्मयला विनोदी कलाकार खूप आवडतात. लहान सहान गोष्टींवर मनमुराद हसायला आवडतं. ‘अलबत्या गलबत्या’चं दिग्दर्शन करण्यासाठी हेच कामी आलं आणि एक बालनाट्य फुलवण्यासाठी पोषकही ठरलं. या निमित्ताने त्याने मोठ्यांनाही आवडेल अशा नाटकाचं डिझाईन तयार केलं. त्याला ग्रँजर दिलं जे यशाचा पाया मजबूत करण्यासाठी पूरक ठरलं.


दीड महिन्यात ६५ प्रयोग...

या नाटकाने जवळजवळ दीड महिन्यांमध्ये केवळ मुंबई-पुणे येथे ६५ प्रयोग सादर केले आहेत. अजून उर्वरीत महाराष्ट्र बाकी आहे. झी मराठी प्रस्तुत, अद्वैत थिएटर निर्मित आणि रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचे निर्माते राहुल भंडारे आहेत. गोट्या सावंत या नाटकाचे सूत्रधार आहेत. रंगभूषा उल्हेश खंदारे यांनी केली असून, वेशभूषा महेश शेरला यांची आहे.



हेही वाचा-

“नाटक पहा, आवडलं तर पैसे द्या”

स्त्रियांच्या समस्येसाठी ‘पळापळ’ करणार प्रदीप पटवर्धन !



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा