Advertisement

EXCLUSIVE : दिग्पालपुढे मृत्यू आणि सावरकरांमधील संघर्ष मांडण्याचं ‘चॅलेंज’

१९१० मध्ये जेव्हा सावरकर अंदमानात पोहोचले, तेव्हा तिथे आत्महत्येचा दर वर्षाला जवळजवळ ८० टक्के होता आणि १९२१ मध्ये जेव्हा त्यांची सुटका झाली, तेव्हा तो जवळजवळ पाच टक्क्यांवर आला होता. एवढा मोठा मोरल सपोर्ट त्यांनी तिथल्या राजबंद्यांना दिला. अकरा वर्षात त्यांनी घडवलेली ही वैचारीक क्रांती मला खूप इंटरेस्टिंग वाटली.

EXCLUSIVE : दिग्पालपुढे मृत्यू आणि सावरकरांमधील संघर्ष मांडण्याचं ‘चॅलेंज’
SHARES

छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कोंडाजी फर्जंदची पराक्रमगाथा मांडणाऱ्या ‘फर्जंद’ या चित्रपटासोबतच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार मांडणाऱ्या ‘चॅलेज’ या नाटकाचं यशस्वी दिग्दर्शन करणारा लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पााल लांजेकर आता एक नवं नाटक घेऊन आला आहे. ‘हे मृत्युंजय’ असं शीर्षक असलेलं हे नाटक अंदमानमधील शिक्षा भोगणाऱ्या सावरकरांच्या विचारसरणीवर प्रकाश टाकणारं आहे. 

अनामिका आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या एकत्रीत योगदानातून या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. दिग्दर्शनासोबतच दिग्पालने या नाटकाचं लेखनही केलं आहे. २६ आॅक्टोबरला दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे स्वेच्छा मूल्य या तत्त्वावर या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. पुन्हा एकदा सावरकरी विचारधारेतील नाटक रंगभूमीवर आणण्यामागील भावना दिग्पालने ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचीत करताना व्यक्त केल्या.आधी एकांकीका मग नाटक

काही वर्षांपूर्वी सोलापूरला सावरकर करंडक स्पर्धा झाली होती. त्यामध्ये जन्मठेप या विषयावर एकांकिका करावी असा निकष होता. त्यात ९७ संघांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी मला काही सुचत नव्हतं. अगदी चार-पाच दिवसांवर स्पर्धेत सहभागी होण्याची तारीख आली असताना एके रात्री अचानक मनात एक विचार आला. आपल्याला जन्मठेपेमध्ये तीन वेळा आत्महत्या करावीशी वाटली, असं सावरकरांनी लिहिलं आहे. हाच विचार मनाला चटका लावून गेला आणि उत्सुकताही वाढली. त्यातूनच ‘अवध्य मी’ नावाची एकांकिका आकाराला आली. 


‘अवध्य मी’ ते ‘हे मृत्युंजय’

‘अवध्य मी’ ही एकांकिका नाटकाच्या रूपात सादर करताना याचं शीर्षक ‘हे मृत्यूंजय’ असं ठेवलं आहे. सावरकरांचं आत्मबल नावाचं एक गीत आहे. ‘अनादी मी अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपु असा कवण जन्मला...’ श्रीमद्भगवतगीतेमध्ये सांगितल्यानुसार मी अविनाशी तत्त्व आहे असं सावरकरांचं म्हणणं होतं. मृत्यूला जिंकणारे सावरकर अशी त्यांची ओळख करून देणारं हे नाटक असल्याने ते जेव्हा व्यावसायिक रंगभूमीवर आणायचं ठरलं, तेव्हा ‘हे मृत्युंजय’ असं शीर्षक ठेवलं. 


हेच नाटक का?

१९१० मध्ये जेव्हा सावरकर अंदमानात पोहोचले, तेव्हा तिथे आत्महत्येचा दर वर्षाला जवळजवळ ८० टक्के होता आणि १९२१ मध्ये जेव्हा त्यांची सुटका झाली, तेव्हा तो जवळजवळ पाच टक्क्यांवर आला होता. एवढा मोठा मोरल सपोर्ट त्यांनी तिथल्या राजबंद्यांना दिला. अकरा वर्षात त्यांनी घडवलेली ही वैचारीक क्रांती मला खूप इंटरेस्टिंग वाटली. २०१० मध्ये आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्या होत्या. त्यामुळे सावरकरांचा हा विचार मुलांपर्यंत पोहोचवला पाहिजे असं वाटलं. एवढ्या मोठ्या छळातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी हे क्रांतीकारक जिवंत राहिले, तर तुम्ही असे कुठले कष्ट भोगताय की ज्यातून तुम्हाला आत्महत्या करावीशी वाटते. यामुळे या नाटकाची निर्मिती करावीशी वाटली.


मृत्यू आणि सावरकर!

या नाटकाच्या माध्यमातून मृत्यू आणि सावरकर यांच्यातील संवाद मांडण्यात आला आहे. दोन तुल्यबळ व्यक्ती एकमेकांसमोर आहेत. त्यातील एक प्रचंड पॅाझिटीव्ह विचारसरणीचे सावरकर आणि दुसरा प्रचंड निगेटीव्ह असलेला मृत्यू यांच्यातील संघर्ष यात आहे. अंदमानातील जगण्यापेक्षा मृत्यू आकर्षक आहे. कारण तो छळापासून वाचवतो. अशा परिस्थितीत तो मृत्यू सावरकरांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरतो का दाखवणारं हे थरारक नाटक आहे. यात एक वैचारिक झुंज पाहायला मिळते.


विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे

निर्माते दिनेश पेडणेकर, अनामिका आणि ‘चॅलेंज’ पाहून प्रेरित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या दोन्ही संस्थांच्या एकत्रित योगदानाने हे नाटक रंगभूमीवर येत आहे. या स्मारकाचे रणजीत सावरकर आणि मंजिरी मराठे यांनी जेव्हा ‘चॅलेंज’ हे नाटक पाहिलं, तेव्हा कॅालेजमध्ये या नाटकाचे प्रयोग व्हायला हवेत असं त्यांना वाटलं. त्यातूनच मग या नाटकाची संकल्पना पुढे आली. सावरकरांचे विचार आणि साहित्य शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी सावरकर स्मारकासोबत आमचाही हा प्रयत्न आहे.


सावरकरांच्या भूमिकेत अजिंक्य ननावरे

‘चॅलेंज’ या नाटकात निखील राऊतला सावरकरांच्या भूमिकेत यशस्वीपणे सादर केल्यानंतर या नाटकात दिग्पालने अजिंक्य ननावरे याला सावरकरांच्या व्यक्तिरेखेत घेऊन येणार आहे. याशिवाय रघुनंदन बर्वे, जयेंद्र मोरे, योगेश दळवी, मधुसूदन सोनावणे, सुयश पुरोहित, शार्दूल आपटे, नितीन वाघ, बिपीन सुर्वे, ऋषिकेश धर्माधिकारी, संदीप सोमण, केतन पाडळकर, आदित्य घोंगे, प्रतिक गोसावी यांच्याही या नाटकात भूमिका आहेत. साईसाक्षी प्रकाशीत या नाटकाचं नेपथ्य संदेश बेंद्रे, संगीत देवदत्त मनीषा बाजी, प्रकाश शीतल तळपदे यांनी केलं आहे. रंगभूषा संतोष पेडणेकर यांची आहे.हेही वाचा - 

दाक्षिणात्य सिनेमाकडे वळली ऋत्विकची पावलं

रोहित-जुईलीचं ‘सरगम टंग ट्विस्टर चॅलेंज’
संबंधित विषय
Advertisement